मुंबई, दि. १ जुलै : वृक्ष लावण्यापेक्षा वृक्ष जगवण्याचे काम आव्हानात्मक आहे. वृक्षांशिवाय मानवास भविष्य नाही त्यामुळे पर्यावरण रक्षणाबरोबर जलव्यवस्थापन आणि जैवविविधतेचे रक्षण व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
वनमहोत्सवाच्या निमित्ताने आज वन विभागातर्फे राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावले जात आहेत. त्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आज माहिम येथील निसर्ग उद्यानात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वन मंत्री प्रकाश जावडेकर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, महापौर स्नेहल आंबेकर,खासदार अरविंद सावंत, आमदार वर्षा गायकवाड, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, श्रीमती सपना सुधीर मुनगंटीवार, अभिनेता विवेक ओबेरॉय,वन विभागाचे सचिव विकास खारगे, आदी मान्यवरांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, १५०० शालेय विद्यार्थी, सामाजिक-स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वृक्ष जगले तर आपण आपली भावी पिढी जगू शकेल हे लक्षात घेऊन सर्वांनी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करून श्री. राव म्हणाले की, विद्यापीठांचा कुलपती म्हणून आपण सर्व विद्यापीठांना त्यांच्या परिसरात वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी वन विभागाने विद्यापीठांना उत्तम रोपे उपलब्ध करून द्यावीत. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी मराठवाड्याच्या प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जावी अशी सूचना केली.
एक झाड पडले तर तिथे दुसरे झाड लावले गेले पाहिजे. मुलाचा जन्म असो की वाढदिवस प्रत्येक आठवणींचे जतन हे एक रोप लावून झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्य वृक्ष, राज्य प्राणी, राज्य फुल, राज्य फुलपाखरू अशी राज्यांची मानचिन्ह लोकमानसापर्यंत विशेषत: शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्याचे त्यांना ज्ञान व्हावे यासाठी मराठीत एखादा पाठ सुरु करण्यात यावा अशी सूचनाही राज्यपालांनी केली
No comments:
Post a Comment