पालिकेला खड्ड्यांची डोकेदुखी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2016

पालिकेला खड्ड्यांची डोकेदुखी

मुंबईमध्ये पावसाळयात दरवर्षी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची चर्चा असते. पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी पडताच रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात होते. खड्डे पडल्याचे मिडियामध्ये आल्यावर लोकप्रतिनिधी, पालिका आयुक्त आपले दौरे काढून खड्ड्यांची माहिती घेतात आणि आवश्यक त्या सूचना देत असतात. लोकप्रतिनिधी, बडे अधिकारी दौऱ्यावर येणार आहे याची माहिती मिळताच रस्त्यावरील खड्डे बजावल्याचे दाखवण्यात येते. परंतु अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची पाठ फिरताच पुन्हा आहे तसेच खड्डे पडलेले असतात. 

मुंबईमध्ये सध्या रस्ते घोटाळा चांगलाच गाजतो आहे. रस्त्याच्या कामात अनियमितता आढळून आल्याने कंत्राटदारांना काळ्या यादी मध्ये टाकताना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप १० खाजगी लेखापाल, १२ कंत्राटदाराकडे काम करणारे १२ साईट इंजिनियर, पालिकेचे मुख्य अभियंता पवार, दक्षता अधिकारी मुरुडकर अश्या २४ लोकांना अटक करण्यात आली आहे. यावरून रस्त्याची कामे कश्या प्रकारे झाली असतील याची प्रचिती येते.   

रस्त्यावर खड्डे पाडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे निकृष्ट दर्जाचे साहित्य. पालिका खड्डे बुजवण्यास करोडो रुपये दर वर्षी खर्च करत असली तरी ज्या दर्जाचे साहित्यच पुरावले जात नसल्याने पुन्हा पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत असतात. पालिका अधिकाऱ्यांना याची जण असली तरी खड्डे बुजवणाऱ्या कंत्राटदाराचे बिल मंजूर झाले की किंवा बिल मंजुरीसाठी आले की आपला हिस्सा मिळणारच अशी १०० टक्के खातरी असल्याने अश्या कंत्राटदारावर कारवाई करण्यास बगल दिली जाते. 

मुंबईमध्ये ९ जुलै २०१६ पर्यंत खड्डयांबाबत ४८२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ४१६ खड्डे बुजवले गेले असून उर्वरित ६६ खड्डे बुजवणे शिल्लक असल्याची नोंद पालिकेच्या खड्डे अहवालात दिसून येत आहे. हापालिकेच्या वरळी अस्फाल्टमधून डांबरमिश्रित खडीचा वापर करून बुजवण्यात येणारे कोल्डमिक्सचे तंत्रज्ञान निकृष्ठ असल्याची बाब जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिराजदार यांनी रस्ते विभागाच्या प्रमुख अभियंताना लिहिलेल्या पत्राद्वारे उघड झाले आहे. पालिकेचा सहाय्यक आयुक्त तंत्रज्ञान निकृष्ठ असल्याचे सांगत असला तरी पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे म्हणावे लागेल. 

रस्त्यावर खड्डे पडताच काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या विरोधी पक्षांनी विविध ठिकाणी आंदोलने केली आहेत. या प्रकरणी विरोधी पक्षांनी पालिकेच्या सभागृहात आवाज उचलत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. खडबडून जागा झालेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या महापौर, सभागृह नेत्या व स्थायी समिती अध्यक्षांनी रस्ते पाहणी दौरे सुरू केले आहे. दौऱ्या दरम्यान पालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यावर खड्डे नसून राज्य सरकारच्या अखत्यारीतील रस्त्यावर खड्डे असल्याचा सूर आवळण्यात आला. तसे पत्रही महापौर स्नेहल आंबेकर यांनी मुख्यमंत्र्यांना देऊन बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. 

एकीकडे सत्ताधारी शिवसेना रस्त्यावरील खड्ड्यांसाठी राज्य सरकारकडे बोट दाखवत असताना सत्तेत सहभागी असलेल्या भाजपानेही दौरे आयोजित केले. यावेळी मंत्री चंद्रकांता पाटील, आमदार आशिष शेलार यांनी रस्त्याची पाहणी करून पश्चिम द्रुतगती मार्गाला रोल मॉडेल बनवू असे आश्वासन दिले आहे. याच दरम्यान भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुलुंड ते घाटकोपर एलबीएस रोडचा दौरा करून खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडीओ शुटिंग करून सीडी बनवली आहे. फोटो आणि सीडी मंगळवारी १२ जुलै रोजी महापौर तसेच पालिका आयुक्तांना देणार असल्याचे सोमय्या यांनी कळविले आहे. काँग्रेसनेही खड्ड्यांचे फोटो पाठवण्याचे आवाहन केले आहे. तर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी १२ जुलै रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात खड्ड्यांचे प्रदर्शन भारवले आहे. 

मुंबई महानगरपालिकेने संन २०१२ मध्ये २३ हजार १५० खड्डे बुजवण्यासाठी ४४.२२ कोटी रुपये. सन २०१३ मध्ये ३७ हजर ३२३ खड्डे बुजवण्यासाठी ४६.२६ कोटी रुपये, संन २०१४ मध्ये १४ हजार ७६ खड्डे बुजवण्यासाठी ३४.१७ कोटी, संन २०१५ मध्ये ६०४८ खड्डे बुजवण्यासाठी १०.४७ कोटी तर संन २०१६ मध्ये ३२० खड्डे बुजवण्यात आले असून यावर्षी ३५ कोटी रुपये मंजूर असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. गेल्या ५ वर्षात खड्डे बुजवणायसाठी पालिकेने १७५ कोटी रुपये खर्च केले आहेत. पालिका चांगले रस्ते बनवण्यासाठी आणि खड्डे बुजवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत असताना भ्रष्टाचारामुळे चांगली कामे होताना दिसत नाहीत. 

याचा अनुभव खुद्द पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे. एखादा खड्डा बुजवला असला तरी दुसऱ्या दिवशी त्यामधील खडी आणि डांबराचे मिश्रण योग्य प्रकारे नसल्याने पुन्हा खड्डे पडत आहेत. खाडी रस्त्यावर इकडे तिकडे वाहून गेल्याने अपघाताचे प्रकार होऊ शकतात याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी जे मिश्रण वापरले जाते ते पालिकेच्या वरळीच्या अस्फाल्टमधून आणले जाते. पालिकेचे कोल्डमिक्सचे तंत्रज्ञान निकृष्ठ दर्जाचे असल्याने खडी आणि डांबर वेगळा झाल्याने रस्त्यावर खड्डे पडत असल्याची बाब जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादर यांनी रस्ते प्रमुख अभियंता यांना लिहिलेल्या निदर्शनास आणली आहे. 

एका अधिकाऱ्यानेच अशी तक्रार केल्याने पालिका खड्डे बुजवण्यासाठी वापरात असलेल्या मिश्रणाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. असा निकृष्ठ दर्जाचा माल वापरल्यास मुंबईमधील रस्त्यावर खड्डे कसे बुजवले जातील ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयुक्तांनी सभागृहात कर्मचाऱ्यांवर गर्व असल्याचे सांगितले आहे. मुंबईकराना पालिकेचे एप्स किंवा इतर संपर्क क्रमांक ज्ञात नलस्याने या तक्रारीचे प्रमाण फारच कमी आहे. पालिकेने लोकांकडून आणखी विविध मार्गानी रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारी मागवल्यास पालिका जे खड्ड्यांचे आकडे सांगत आहे त्यापेक्षा अनेक पटीने हा आकडा वाढू शकतो यात शंका नाही. मुंबईमध्ये बहुतेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परंतू अश्या तक्रारी पालिकेकडे नोंदच होत नाहीत. पालिकेला खड्ड्यांची खरी परिस्थिती माहीत करून देण्यासाठी नागरिकांनी आपल्या विभागातील खराब रस्ते आणि खड्डे याची माहिती कळवण्याची गरज आहे.   

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad