मुंबई, दि. 17: लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी जीवनभर कलेची सेवा केली. त्यांनी कलेच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात चैतन्य फुलविण्याचे काम केले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.
रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित ‘लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध पुरस्कार’ वितरण सोहळ्यात
फडणवीस बोलत होते. यावेळी वत्सला प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त संदेश उमप, अभिनेते मकरंद अनासपुरे, ‘मुंबई मित्र’चे अभिजीत राणे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित पुरस्कार सोहळा हा खऱ्या अर्थाने लोककलावंतांचा सोहळा आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी जीवनभर कलेची सेवा केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी असामान्य कार्य केले आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या कलाप्रकारामध्ये आपला ठसा उमटवला आणि समाजाला जागृत केले, अशा व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार देण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे.
यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांना ‘लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, लोककलेचे अभ्यासक प्रकाश खांडगे, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना ‘लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
No comments:
Post a Comment