एमआयएम, मुस्लिम लीग, आप, शिवसेना मोर्चात सामील होणार
राणीबाग ते सीएसटी दुकाने, गाड्या बंद ठेवण्याचे आवाहन
मुंबई / अजेयकुमार जाधव
आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू असलेले मुंबईच्या दादर येथील आंबेडकर भवन आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धभुषण प्रिंटिंग प्रेस रात्री अंधारात पाडण्यात आली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही दोषी लोकांना अटक केली जात नसल्याने १९ जुलै रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये एमआयएम, मुस्लिम लीग, आप, शिवसेना इत्यादी पक्ष संघटना सहभागी होणार असल्याने नाव इतिहास घडणार आहे. या मोर्चापासून आंबेडकरी चळवळीचे नवे पर्व सुरू होईल असे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे काशिनाथ निकाळजे, भाई सावंत, संघराज रुपवते, ख्वाजा मिया पटेल, रमेश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. १९ जुलैच्या मोर्चाच्या तयारी संदर्भात आंबेडकर भवन येथे आयोजित आढावा बैठकीत आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना आंबेडकर भवन पाडण्यासाठी पालिकेची ३५४ कलमाची नोटीस मिळवणे, नवी इमारत बांधण्यासाठी आयओडी मिळवणे हे एकट्या रत्नाकर गायकवाड सारख्याच काम नसून यामागे आंबेडकरी विचार संपवणाऱ्या अनेक लोकांचा सहभाग आहे. आंबेडकरी विचारांचे वादळ थांबवण्यासाठी आणि चळवळ संपवण्यासाठी मनुवादी सरकारने हे षडयंत्र रचल्याचे आनंदराज म्हणाले.
आधी या लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या संस्थांना टार्गेट करत दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या केल्या आहेत. आता आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू उध्वस्त केले आहे. या लोकांनी आंबेडकरी चळवळीच्या केंद्र बिंदूलाच हात घातला आहे. मुख्यमंत्र्यांना याबाबत सांगूनही मुख्यमंत्र्यांना अद्याप अक्कल आलेली नाही. पेशवाई आम्हीच समाप्त करून आमच्या लोकांनी इतिहास घडवला आहे. आता पुन्हा आमचे लोकच पेशवाई संपवतील. आंबेडकरवाद्यांना नक्षलवादी म्हणणाऱ्या लोकांचं समाचार घेताना आमचा आंबेडकरवाद जेव्हा मागे लागेल तेव्हा तुम्हाला पळायलाही जाग उरणार नाही असा इशारा आनंदराज यांनी दिला आहे.
आंबेडकरी जत्थे मुंबईत दाखल
१९ जुलैच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी भारतातून कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडू अश्या अनेक राज्यातून आंबेडकरी जनता मुंबईकडे रवाना झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून कार्यकर्त्यांनी मुंबईला पोहचण्यासाठी संपूर्ण ट्रेनची बुकिंग केली आहे. कित्तेक जिल्ह्यातून बस व इत्यादी वाहनाने लोक निघाली असून लाखोंच्या संख्येने आंबेडकरी जनता १८ जुलैला मुंबईमध्ये दाखल होत आहे.
आप आपल्या पक्षाचे ब्यानर झेंडे आणा
आंबेडकर भवन पडल्याच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चात अनेक पक्ष संघटना सहभागी होत आहेत. यामुळे कित्येकांच्या पाया खालची वाळू सरकू लागल्याने फक्त निळा झेंडाच अशी अफवा पसरवली जात आहे. याबाबत खुलासा करताना आम्ही कोणालाही आपल्या पक्षाचे झेंडे ब्यानर आणण्यास मज्जाव केलेला नाही. या मोर्चात अनेक पक्ष संघटना रस्त्यावर उतरणार असल्याने त्या त्या पक्षांनी संघटनानी आप आपले झेंडे, ब्यानर घेऊन मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
१९ जुलैच्या मोर्चात लाखो आंबेडकरी जनता आणि विविध पक्ष संघटना सहभागी होणार आहेत. यामुळे बिथरलेल्या लोकांनी मोर्चाची तारीख पुढे ढकलल्याची अफवा पसरवली आहे. मोर्चाच्या आधी अनेक लोकांना अटक केल्याची अफवा पसरवली जाण्याची शक्यता आहे. यामुळे कोणी कितीही अफवा पसरवल्या कोणाला अटक झाली तरी १९ जुलैच्या मोर्चात न डगमगता लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
दुकाने गाड्या बंद ठेवा
आंबेडकर भवन पाडल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतप्त भावना आहेत. मोर्चा दरम्यान या संतापात भावनांचा उद्रेक होऊ शकतो यामुळे मोर्चा ज्या ठिकाणाहून जाईल तिकडची दुकाने सुरू दिसल्यास, रस्त्यावर गाड्या उभय दिसल्यास त्याला टार्गेट करून मोड तोड होण्याची शक्यता आहे. यामुळे मोर्चा निघणाऱ्या भायखळा राणीबाग पासून छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंतची दुकाने बंद ठेवावीत. रस्त्यावर गाड्या उभ्या करू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. आवाहन करूनही जर दुकाने उघडी असल्यास, रस्त्यावर गाड्या उभ्या दिसल्यास काही अनुचित प्रकार घडल्यास याला संबंधित दुकानदार, गाडी चालक मालक, आणि सरकार जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment