मुंबई : किमान वेतन, थकबाकी आदी मागण्यांसाठी सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांनी कचरा वाहतूक श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाखाली राणीबाग ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने मागण्यांबाबत अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली असता ४१ कामगारांना कामावर घेतले जाईल तसेच किमान वेतन, थकबाकी याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी दिली. मात्र मागण्यांबाबत त्वरित निर्णय घेऊन अंमलबजावणी झाली नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही रानडे यांनी दिला.
महापालिकेच्या घनकचरा विभागात सुमारे ६ हजार कामगार काम करतात. प्रत्येक कामगाराची २ लाख ४२ हजार ४00 रुपये इतकी थकबाकी आहे. गेल्या वर्षभरापासून ही थकबाकी मिळावी, म्हणून कामगार मोर्चे, आंदोलने करत आहेत. कामगारांना थकीत रक्कम मिळावी म्हणून १५ महिने पालिकेकडे पाठपुरावा केला आहे; परंतु घनकचरा विभागातील या वंचित कामगारांवर अन्याय केला जातो आहे. महाराष्ट्र सरकारने किमान वेतनाचे दर २५ फेब्रुवारी २0१५ रोजी जाहीर केले. हे किमान वेतनाचे दर मुंबई महापालिकेलाही लागू आहेत. मात्र याची अंमलबजावणी झालेली नाही. किमान वेतनाचे दर घनकचरा व्यवस्थापन वगळता इतर सर्व खात्यांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे सर्व कामगार मागासवर्गीय समाजाचे आहेत. पालिकेचे दरपत्रक हे कामगारांमध्ये भेदभाव करणारे, दलित विरोधी व बेकायदेशीर आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. दरम्यान, दुष्काळी भागातून मुंबईत कामासाठी आलेले हे स्थलांतरित कामगार असून घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. त्यांच्यावर होणार्या अन्यायाविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करावे लागले. शिष्टमंडळाची अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याशी झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे रानडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment