मुंबई, दि. 20 : आदिवासी विभागांतर्गत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोट खरेदी प्रकरणाबाबतची चौकशी विभागामार्फत सुरु असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही मागणी झाल्यास उद्योग विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत सांगितले.
या संदर्भात विधानसभा सदस्य हसन मुश्रीफ यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना आदिवासी विकास मंत्री म्हणाले की, राज्यात एकूण 529 शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये सुमारे 1 लाख 91 हजार 818 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विविध साहित्य वेळेवर मिळण्यासाठी आदिवासी विकास मंत्री स्तरावर चार बैठका घेण्यात आल्या. दिनांक 7 मे 2016 च्या पत्रान्वये नाशिक आदिवासी विकास आयुक्त व सर्व अपर आयुक्त यांना खरेदीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याबरोबरच रेनकोट साठी खरेदीची कार्यवाही वेळेत सुरु झाली नाही. दरम्यानच्या काळात मुख्याध्यापक स्तरावरुन रेनकोट खरेदीचे अधिकार देण्यास शासनाने मान्यता दिली. मात्र या संदर्भात काही संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने दोन वेळेस स्थगिती दिली होती.
दिनांक 13 जुलै, 2016 रोजी मुंबई उच्च न्यायालयात या याचिकांवर सुनावणी झाली त्यामध्ये ज्या 12 प्रकल्पांमध्ये रेनकोट खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरु होती. त्यापैकी दोन ठिकाणी कार्यवाही पूर्ण झाल्याने उर्वरित दहा प्रकल्पांमध्ये ज्या स्तरावर निविदा प्रक्रिया बंद केली होती ती पुढे सुरु करुन दहा दिवसांत पूर्ण करावी तसेच विविध प्रकल्पांतील मुख्याध्यापक स्तरावरुन व ई-निविदेद्वारे रेनकोट खरेदी झालेल्या 68 शाळा वगळून उर्वरित 17 प्रकल्पांमध्ये अल्पमुदतीची निविदा मागून रेनकोट खरेदीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशास अनुसरून राज्य शासनाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असून ज्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी निविदा काढलेल्या नाही अथवा विलंब केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेनकोट खरेदी प्रकरणी आयुक्त व सर्व अपर आयुक्त यांची 18 जुलै रोजी बैठक घेऊन 30 जुलैपर्यंत रेनकोट खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आदी सदस्यांनी भाग घेतला.
No comments:
Post a Comment