मुंबई दिनांक ३० जुलै, २०१६ - मुंबईसह देशातील आणि राज्यातील अनेक शहरांचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत आहे. हे नागरीकरण होताना नुसतेच सिमेंटच्या इमारती न वाढविता त्या इमारतींसोबत मोठय़ा प्रमाणात वृक्षांची लागवडही करावी, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
बृहन्मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे महापालिका भारत स्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्र, आरे कॉलनी मार्ग, फिल्टरपाडा, पवई येथे आज (दिनांक ३० जुलै, २०१६) वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला, याप्रसंगी महापौर आंबेकर भारत स्काऊट-गाईडस् शिक्षकांशी संवाद साधताना बोलत होत्या. यावेळी उप महापौर अलका केरकर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर, नगरसेवक अविनाश सावंत, उप शिक्षणाधिकारी अर्चना नांदेडकर, भारत स्काऊट आणि गाईडस् च्या शिक्षिका पॉल हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापौर स्नेहल आंबेकर, उप महापौर अलका केरकर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर, नगरसेवक अविनाश सावंत यांच्या हस्ते विविध प्रजातींच्या रोपटय़ांचे रोपण करण्यात आले. त्यानंतर स्काऊट-गाईड जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये संवाद साधताना महापौर म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत नागरी सेवा-सुविधा दिल्या जातात. यासोबतच शिक्षण विभागामार्फत भारत स्काऊट आणि गाईडस् विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिले जातात. स्काऊट आणि गाईडस् विद्यार्थ्यांची संख्या आज २० हजारांवर आहे, याबद्दल महापौरांनी शिक्षण विभागाचे कौतुक केले.
महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत वृक्षांचे रोपण व संवर्धन मोठय़ा प्रमाणात हाती घेतले आहे. ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ही महापालिका व्यापक स्तरावर राबवित आहे. या सर्व लोक प्रबोधनाच्या कार्यक्रमात लोकसहभागाची आवश्यकता आहे. मुंबईचा विकास साधण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांनी सांगितले की, आरे कॉलनी मार्ग, फिल्टरपाडा येथे निसर्गाच्या सान्निध्यात वृक्षारोपण करीत असल्याने हा भाग आणखी बहरणार आहे. स्काऊट आणि गाईडस् तर्फे ह्या परिसराच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून हे काम त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश वरळीकर यांनी प्रशासनाला दिले. हीच मागणी स्थानिक नगरसेवक अविनाश सावंत यांनीही केली. पावडे यांनी प्रास्ताविक केले तर उप शिक्षणाधिकारी अर्चना नांदेडकर यांनी आभार प्रदर्शन केले.
No comments:
Post a Comment