मुंबई - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'एल' विभागातील 'महाराष्ट्र काटा ते कुर्ला कोर्ट' या दरम्यानच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील सुमारे ६५ अनधिकृत स्टॉल्स व दुकाने; तसेच पी उत्तर विभागातील मालाड पश्चिम परिसरातील साईनाथ बाजार, कस्तुरबा मार्ग, आनंद मार्ग या भागात धडक कारवाई करण्यात येऊन २० अनधिकृत दुकाने हटविण्यात आली आहेत. परिमंडळ ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार लाल बहादूर शास्त्री मार्गावरील; तर परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार मालाड पश्चिम परिसरातील कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या 'एल' विभागाद्वारे लाल बहादूर शास्त्री मार्गावर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान २५ अनधिकृत स्टॉल्स व ४० दुकाने हटविण्यात आले आहेत. या कारवाईसाठीच्या महापालिकेच्या चमूमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्यासह ४३ जणांचा समावेश होता. तर १ जे.सी.बी., १ डंपर, ५ टेम्पो इत्यादी वाहनांचाही वापर या कारवाई दरम्यान करण्यात आला. ही कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ४१ जणांच्या चमूचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कारवाईमुळे लाल बहादूर शास्त्री मार्गावरील वाहतूक अधिक सुलभ व सुकर होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती 'एल' विभागाचे सहाय्यक आयुक्त अजयकुमार आंबी यांनी दिली आहे.
तसेच महापालिकेच्या 'पी उत्तर' विभागाद्वारे मालाड पश्चिमकडील साईनाथ बाजार, कस्तुरबा मार्ग, आनंद मार्ग या परिसरातील २० अनधिकृत दुकानांसह मोठ्या प्रमाणात फेरीवाले होते. यामुळे मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूकीची व पादचा-यांची कोंडी होत होती. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेद्वारे अनधिकृत दुकाने हटविण्यासह फेरीवाल्यांवर देखील धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे हा परिसर मोकळा होण्यास मदत झाली आहे. ही कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीसांची मोलाची मदत झाली आहे, अशी माहिती 'पी उत्तर' विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ.संगीता हसनाळे यांनी दिली आहेत.
No comments:
Post a Comment