मुंबई, दि. 25 : 'मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र' या संकल्पनेच्या माध्यमातून राज्याच्या उद्योग क्षेत्राच्या वृध्दीसाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्र हे औद्योगिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठिकाण असुन राज्यात गुंतवणूकीसाठी इच्छूक असलेल्या उद्योजकांचे स्वागत केले जाईल, तसेच उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना शासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल,अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज चीनच्या शिष्टमंडळाला दिली.
देसाई यांच्या ‘पुरातन’ या निवासस्थानी चीनच्या बॅग उत्पादक कंपनीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. चीन स्थित ‘डीसीपी ट्रॅवेलिंग गुड्स को.लि.’ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्नी प्रेसिडेंट, डिक्की संस्थेचे अध्यक्ष मिलींद कांबळे,संतोष कांबळे,उद्योजक राजीव गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.
देसाई म्हणाले, चीनसोबत भारताचे चांगले संबंध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' या संकल्पनेतून सध्या भारतात चीननेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे.देशात विशेषतः महाराष्ट्रात चीनच्या उद्योजकांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे चीनच्या उत्पादक कंपन्यांना राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, तसेच यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल.त्याचबरोबर शासन आणि उद्योजकांमध्ये सुसंवाद वाढावा व प्रस्तावित प्रकल्पांना गती देण्यासाठी चीनच्या वाणिज्य दूतांसमवेत बैठक घेवून चर्चा व्हावी, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment