मुंबई / प्रतिनिधी 12 July 2016 - यंदाच्या पावसामध्ये दरवर्षी प्रमाणेच या वर्षी ही मुंबईच्या रस्त्यांची दाणादाण उडालेली आहे. जागोजागी रस्त्यात खड्डेच खड्डे निर्माण झालेले आहेत. या खड्ड्यांमुळे मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला रोज सामोरे जावे लागत आहे. मुंबईकर निराश झालेले आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपाची सत्ता आहे, त्यांचे या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे शुक्रवार १५ जुलै, २०१६ रोजी सकाळी ११.०० वाजता फ़ॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय पर्यंत ‘‘पॉटहोल दिंडी’’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की शिवसेना आणि भाजपाला विठ्ठलाने चांगली सुधबुद्धी देण्यासाठी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी भजन कीर्तन करत टाळ मृदूंगाच्या जयघोषात आम्ही ‘‘पॉटहोल दिंडी’’ काढत आहोत. आम्ही या आधी मुंबईतील खड्डयांसंदर्भात ऑनलाइन फोटो चळवळ ‘‘बोल मेरे पॉटहोल बोल’’ सुरू केलेली होती. त्यावेळी आम्ही मुंबईकरांना आवाहन केले होते की, त्यांनी जिथे जिथे खड्डे दिसतील तिथले फोटो काढून आम्हाला व्हाट्स अँप, ईमेल आणि ट्विटर करावेत. या चळवळीला आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आमच्याकडे संपूर्ण मुंबईतील खड्ड्यांचे फोटो मिळालेले आहेत. ते फोटो घेऊन आम्ही ‘‘पॉटहोल दिंडी’’ काढणार आहोत. या दिंडीची सांगता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आरती करून संपणार आहे, असे संजय निरुपम म्हणाले.
No comments:
Post a Comment