मुंबई महानगर पालिकेच्या बाजार व उद्यान विभागाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी बनवण्यात आलेली डॉकयार्ड रोड येथील बाबू गेनू मंडईची इमारत २७ नोव्हेंबर २०१३ ला सकाळी पहाटे कोसळली होती. हि इमारत कोसळल्याने ६१ लोकांचा मृत्यू झाला असून ३४ हून अधिक लोक जखमी झाले होते. हि घटना घडल्या नंतर पालिकेच्या मंडई, मार्केट असलेल्या जागेची पाहणी करून नवी मार्केट उभी राहू लागली आहेत.
पालिकेच्या बहुतेक मंड्या या एकाच मजल्याच्या होत्या. या जागेचा चांगला वापर व्हावा, पालिकेला चांगला महसूल मिळावा म्हणून मार्केटच्या जागेवर टोळेजंग इमारती उभारल्या जात आहे.
असेच एक मार्केट एन विभागाच्या हद्दीत पंत नगर, मच्छी मार्केटच्या जागेवर उभे केले आहे. या इमारतीला पालिकेने सुचिता बिजनेस पार्क असे नाव दिले असून या इमारतीमध्ये गेले वर्षभर दुकाने, मच्छी मार्केट पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
एखादी इमारत बांधताना इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्या इमारतीचा वापर केला जातो. परंतू पालिकेचे सुचिता बिजनेस पार्क मात्र याला अपवाद आहे असे म्हणावे लागेल. एक वर्ष या बिजनेस पार्क मधील दुकाने आणि मच्छी मार्केट सुरू असले तरी या इमारतीचे वरील माल्यांचे काम आजही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. खाली दुकाने आणि मच्छी मार्केटमध्ये लोकांची नेहमीच गर्दी असते.
अश्या गर्दीच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा ना ठेवता बिजनेस पार्कचे वरील मजल्यांचे काम सुरू आहे. वरून खाली काही बांधकामाच्या वस्तू पडल्यास सुरक्षा जाळीही बसवण्यात आलेली नाही. यामुळे या ठिकाणी सातत्याने बांधकामाच्या वस्तू खाली पडत असतात. इमारतीचे काम सुरू असताना अनेक वेळा बांधकाच्या वस्तू, काचा खाली पडत असल्याची तक्रार करूनही बिल्डर म्हणा की पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने आता या बिजनेस पार्कचे काम लोकांचा जीव घेऊ लागले आहे.
मंगळवारी रात्री ९. ३० वाजता अजय छोटूलाल कनोजिया हा २५ वर्षाचा तरुण घाटकोपर स्टेशनकडे जात असताना सूचिता बिजनेस पार्कच्या सहाव्या मजल्यावरची काच खाली पडली ही काच अजयच्या डोक्यात पडली अजयला आजू बाजूच्या लोकांनी त्वरित पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले परंतु डोक्याची जखमी इतकी खोल होती की त्यांचा मृत्यू झाला. अजय हा कल्याणाच्या चिंचपाडा विभागातील रहिवासी आहे. तो घाटकोपर मध्ये एक गारमेंटमध्ये काम करीत होता. पालिकेने विकासकाला वारंवार या काचांबाबत पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात येते.
परंतू याबाबत कोणतीच कारवाई केली गेली नसल्याने या अगोदर देखील काही लोक अशा काचा पडल्याने जखमी झाले होते. परंतु पालिका आणि विकासकाने केलेल्या दुर्लक्षीत पणामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पालिका अधिकारी आणि विकासक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका राखी जाधव केली आहे. तर पोलिसांनी आकस्मिक गुन्ह्याची नोंद केली असून चौकशीअंती विकासकावर गुन्हा दाखल करू असे तपास अधिकारी राजेश केवले यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळचे जुने मच्छी मार्केट व गाळे तोडून सुचिता बिजनेस पार्क उभारण्यात आले आहे. अगदी स्टेशन जवळ मोक्याच्या जागेवर असलेल्या या बिजनेस पार्कच्या बाजूने सकाळ, संध्याकाळ घाटकोपर स्टेशनकडे लाखो लोक ये जा करत असतात. यामध्ये कामावर जाणारे, शाळेत जाणारे विद्यार्थी, खरेदीला आलेली लोक यांची संख्या मोठी आहे. असे अपघात पुढेही होत राहिल्यास अजय प्रमाणे अनेक लोकांचे जीव जात राहतील. कित्तेक लोक जखमी होत राहतील. पालिकेने याची दाखल घ्यायला हवी.
पालिकेकडे सुचिता बिजनेस पार्कच्या कामामुळे अपघात होत असल्याच्या तक्रारी आल्याने विकासकाला सूचना किंवा आदेश दिले होते. परंतू विकासकाने त्याकडे दुर्लक्ष केले. विकासक दुर्लक्ष करत असताना पालिकेनेही पुढील कारवाई केलेली नाही. यामुळे अजय कनोजिया या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पालिकेने अजयच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून त्याच्या कुटुंबीयाना आर्थिक मदत करायला हवी. तसेच अजयच्या एका नातेवाईकाला पालिकेची नोकरी देण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी पुढाकार घ्यायला हवा.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३९३
मो. ९९६९१९१३९३
No comments:
Post a Comment