कांदिवलीत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2016

कांदिवलीत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील बंदर पाखाडी येथे पार्वतीबाई प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने कचरा वर्गीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. दत्तक वस्ती योजनेअंतर्गत घराघरांतून गोळा होणाऱ्या कचऱ्याचे येथे वर्गीकरण करण्यात येत आहे. सुका कचरा बाजूला करून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येत असून, याद्वारे दररोज किमान ३० ते ४० किलो कचरा कमी होत आहे, असा दावा संस्थेचे अध्यक्ष अनिल चासकर यांनी केला आहे.

महापालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. वस्ती, रस्ते आणि इतर विभागांत घनकचरा व्यवस्थापनाच्या वतीने दत्तक वस्ती आणि क्लीनअपच्या माध्यमातून दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले जाते. आर/दक्षिण विभागात दररोज किमान १८० टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पार्वतीबाई प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून बंदर पाखाडी येथे कचरा वर्गीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. कचऱ्यातून निवडलेला ओला कचरा बांधण्यात आलेल्या पिट्समध्ये टाकला जातो. वारंवार टाकण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यातून खतनिर्मितीला बाधा ठरणारे इतर घटक काढले जातात. त्यावर बायोकूलम पावडर टाकली जाते. त्यामुळे ओल्या कचऱ्याचे गतीने विघटन होण्यास सुरुवात होते. तसेच १५ ते २० दिवसांनी शेण टाकून कचऱ्याची सरमिसळ केली जाते. अशा प्रकारे कचरा वर्गीकरण केंद्रामुळे कचऱ्याचे वर्गीकरण केल्याने सुक्या कचऱ्यातून कागद, प्लास्टीक व काचेचे घटक भंगारवाल्याला विकण्यात येतात. उरलेल्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाते. या केंद्रामुळे दररोज ओला आणि सुका कचरा मिळून किमान ६० ते ७० किलो कचरा कमी केला जातो. भविष्यात साधारणत: महिन्याला २० ते २५ टन कचरा वर्गीकरण केंद्रामुळे कमी केला जाणार आहे, असे संस्थेचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकल्पाचे आर/दक्षिण विभागाचे सहायक पालिका आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी कौतुक केले आहे. या प्रकल्पासाठी संस्थेचे सचिव हेमंत श्रीमाळी, उपाध्यक्ष मनीषा घार्गे, खजिनदार सुनीता चासकर, सहसचिव अमित वाघ, अनिकेत ढोले आणि प्रवीण डुबल तसेच विष्णू पेटकर आणि सुधीर थवी यांचे सहकार्य लाभले आहे. प्रकल्पासाठी घनकचरा व्यवस्थापनाचे कनिष्ठ अभियंता गुरुनाथ नेरुळकर व पर्यवेक्षक चंद्रकांत निळेकर यांनी मार्गदर्शन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad