मुंबई : मुंबई शहरातील लोकसंख्येनुसार कोणत्या विभागात प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज आहे, त्याचा तपशीलही त्वरित सादर करावा. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी त्याचा बृहत् आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश उद्योगमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले.
स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, इतर साथरोग किंवा तत्सम संसर्गजन्य रोगांवर आळा बसविण्याच्या दृष्टीने शासकीय आरोग्य सेवा संस्था व खाजगी रूग्णालये यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी गठित‘जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती’ची आज मंत्रालयात देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार अजय चौधरी, मुंबई शहर जिल्हाधिकारी अश्विनी जोशी,पोलीस उपायुक्त अश्विनी सानप, जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसरकर, राज्य वीज वितरणचे अधिक्षक अभियंता आर.जे. थुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जवंजाळ आदींसह अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.
देसाई म्हणाले, पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांवर आळा बसावा, तसेच लोकांचे आरोग्य चांगले रहावे, यादृष्टीने मुंबई जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे ‘जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती’चे लक्ष्य असायला हवे आणि यासंदर्भात पाठपुरावा करून तातडीने कार्यवाही करावी. मुंबई शहरामधील प्रत्येक वॉर्डात मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबीर अभियान राबविण्यात यावे. यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत प्रबोधन तसेच प्राथमिक उपचार केले जावे. स्वच्छता असेल तरच आरोग्य चांगले राहील. यासाठी स्वच्छ मुंबई हे अभियानही राबविण्यात यावे. मुंबईत अनेक ठिकाणी शौचकूप नाहीत. यासंदर्भात सामाजिक संस्था कार्य करीत आहेत. मुंबई महानगरपालिकेने त्यांना योग्य ते सहकार्य करावे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी साथीचे आजाराचे रूग्ण कमी आहेत. तसेच साथीचे आजार पसरू नयेत यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामाचा अहवाल डॉ. केसरकर यांनी यावेळी सादर केला.
No comments:
Post a Comment