मुंबई / प्रतिनिधी - दरवर्षीप्रमाणे मुंबईत पुन्हा एकदा खड्ड्यांची बजबजपुरी माजली आहे. त्यामुळे ‘मुंबईत खड्डे की खड्ड्यांची मुंबई’ हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मुंबईत फक्त ६६ खड्डेच आहेत, असा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेचे बिंग पुन्हा एकदा सर्वांसमोर येणार आहे. महापालिकेचा हा दावा किती खोटा आहे, हे दाखवून देण्यासाठी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मुंबईत ‘खड्डे मोजा मोहीम’ राबवली होती.
या ‘खड्डे मोजा मोहिमेअंतर्गत’ मुंबईतील विविध ठिकाणच्या जवळपास ४५० खड्ड्यांची मोजणी करून या खड्ड्यांची विभागवार छायाचित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेत सत्तेवर असलेल्या सेना-भाजप युतीचा खरा चेहरा लोकांसमोर येणार आहे. या खड्ड्यांची मोजणी पूर्ण करून त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन १२ जुलै रोजी आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघात भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांनाही देण्यात आले आहे. ‘मुंबईत खड्डे की खड्ड्यात मुंबई’ या प्रदर्शनाला भेट देऊन सर्वसामान्य मुंबईकरांची फसवणूक करणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या भ्रष्ट कारभाराची कशी लक्तरे काढली आहेत, हे पाहण्यासाठी सर्वांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. मंगळवार १२ जुलै रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात भरणारे हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील.
No comments:
Post a Comment