मुंबई, दि. 21...राज्यातील एकूण 63 विशेष दत्तक संस्थांची तपासणी तीन महिन्यात करण्यात येणार असून तपासणी करण्यासाठी योग्य ते निकष ठरवून जिल्हाबाह्य अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्याचे आदेश महिला व बालविकास आयुक्त यांना देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
विधानसभा सदस्य वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या नांदेड जिल्ह्यातील सिडको येथील सुनिता बालगृहातून एका बालकाची झालेली विक्रीविषयीच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्या बोलत होत्या. मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, बालकांची ऑनलाईन नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे. दत्तक पालकांनीही ऑनलाईन अर्ज करावा. यामुळे बालकाचा प्रवेश आणि दत्तक देणे ही प्रक्रिया पारदर्शक होण्यास मदत होते. तसेच सापडलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेण्यासाठी काही कालावधी देणे गरजेचे असते.
बालगृह बंद करण्याचा कोणताही मानस नसला तरी बालकांना नाहक बालगृहात दाखल करून कुटुंबात राहण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला जात असल्यामुळे आणि कायद्याला तेच अभिप्रेत असल्यामुळे बाल व न्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमानुसार बालकांची काळजी घेण्यात येत आहे. जी बालके निकषात बसत नाहीत त्यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नांदेडच्या सुनिता बालगृहातून एका बालकाची विक्री केल्याने संस्थेच्या तत्कालीन अधिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली होती, असे मुंडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment