आवश्यकतेनुसार टँकर, बोअरवेल अधिग्रहण सुरु राहणार
मुंबई, दि. 1 : राज्यातील काही भागात आतापर्यंत झालेले अपुरे पर्जन्यमान,धरण तसेच तलावातील अत्यल्प जलसाठा विचारात घेता पाणीटंचाई निवारणासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजना राबविण्यास ३१ जुलै २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
सध्याच्या स्थायी आदेशानुसार या उपाययोजना 30 जूनपर्यंत राबविण्यात येतात. पण काही ग्रामीण व नागरी भागातील पिण्याच्या पाण्याची अद्यापही सुरु असलेली टंचाई लक्षात घेता या उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे टंचाई असलेल्या ठिकाणी टँकर, बोअरवेलचे अधिग्रहण आदी विविध ९ उपाययोजना आता ३१ जुलैपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.
मंत्री लोणीकर म्हणाले की, राज्याच्या काही भागात अद्यापही अपुरा पाऊस झाला आहे. तसेच काही ठिकाणी धरणे, तलाव आदी जलसाठ्यांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे अशा भागात टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कालपर्यंत सुमारे ५ हजार ७०० टँकर सुरु होते. गरजेनुसार त्या त्या भागातील टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन टँकर सुरु ठेवले जाणार आहेत. याशिवाय बोअरवेलचे केलेले अधिग्रहणही टंचाई असलेल्या भागात ३१ जुलैपर्यंत आवश्यकतेनुसार कायम राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांनी सविस्तर माहिती घेऊन केवळ पाणीटंचाई निर्माण झालेली गावे, वाड्या तसेच नागरी क्षेत्रात आवश्यकतेनुसार स्थानिक परिस्थिती व स्त्रोतांचा विचार करुन टंचाई परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अंदाज घेऊन पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे आदेश शासनाने दिले आहे.
पाणीटंचाई कालावधी पुढे सुरु ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून त्यांनी पुढील 15 दिवसांत होणाऱ्या पर्जन्यमानाचा विचार करुन पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना पुढे चालू ठेवायच्या किंवा नाही याबाबत आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेशही शासनाने दिले असल्याची माहिती मंत्री लोणीकर यांनी दिली
No comments:
Post a Comment