मुंबई २८ जून २०१६ - बेस्ट उपक्रमाने खाजगी कंत्राटदारांकडून बसगाड्या भाड्याने घेऊन चालविण्याच्या व बेस्ट उपक्रमातील इतर कामे खाजगी कंत्राटदारांना देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाबाबतीत विरोध व्यक्त करण्यासाठी आज बेस्ट वर्कर्स युनियन , बेस्ट कामगार संघटना व समर्थ बेस्ट कामगार संघटनेतील कामगारानी बेस्ट प्रशासनाच्या विरोधात आझाद मैदानात निदर्शने केली.
बेस्ट उपक्रमाने जाहीर केलेल्या टेंडर प्रमाणे बेस्ट प्रशासन खाजगी कंत्राटदारांकडून सध्या १५० बसगाड्या भाड्याने चालवणार आहे. ह्या बसगाड्यांची लागणारे सर्व कर्मचारी बसवाहक वगळता खाजगी कंत्राटदारांचे असणार आहे. तसेच भविष्यात २५० बसगाड्या ट्रॅप वे मल्टीट्रेड प्रायवेट लिमिटेड ह्या खाजगी कंपनीकडून भाड्याने घेणार आहे. सध्या परिवहन अभियांत्रिकी विभागाकडून दैनंदिन पातळीवर बस धुलाई व बस स्वच्छतेचे काम चालते , सादर काम ही खाजगी कंत्राटदारांकडून करून घेण्यासाठी बेस्ट प्रशासन लवकरच टेंडर जाहीर करणार आहे. अशा पद्धतीचे धोरण राबविल्यास येणाऱ्या काळात दिवसेंदिवस बेस्ट उपक्रमातील कायम कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत जाईल व बेस्ट प्रशासन स्वतः हाच्या मालकीच्या व स्वतःचा कर्मचारी वर्ग असलेल्या बसगाड्या दिवसेंदिवस कमी करत नेईल व त्याचा विपरीत परिणाम बेस्ट कामगारांच्या नोकऱ्यांवर होणार असल्याचे बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी यावेळी सांगितले.
आजच्या ह्या महाधरण्यामद्ये बेस्ट च्या खाजगी करणाविरोधातील ही लढाई पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून २९ जून ते १८ जुलै दरम्यान वीस दिवसांच्या कालावधीत बेस्ट कर्मचारी जनसंपर्क मोहीम राबवणार आहे. ह्या मोहिमेअंतर्गत बेस्ट चे कर्मचारी १८ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याना सादर करावयाच्या खाजगीकरणाविरोधातील सामूहिक निवेदनावर मुंबईकर जनतेच्या स्वाक्षऱ्या घेणार आहे. तसेच १८ जुलै रोजी महाराष्ट्र विधान मंडळाच्या अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने बेस्ट चे कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येने आझाद मैदानावर जमून सामूहिक निवेदन मुख्यमंत्र्याना सादर करणार आहेत . याचं दरम्यान बेस्ट समितीकडून टेंडर मानूर करण्याचा बेस्ट कर्मचारी ह्यापुढे तीव्र आंदोलन करतील असेही राव यांनी यावेळी सांगितले .
No comments:
Post a Comment