मुंबई, दि. 29 : देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्याच्या सागरी क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या सर्व मच्छिमारांना व खलाशांना बायोमेट्रिक कार्ड (ओळखपत्र) देण्याचा कार्यक्रम राज्यात सुरु झाला आहे. हा कार्यक्रम 20 जून 2016 पासून सुरु झाला असून दि. 30 जुलै 2016 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत बायोमेट्रिक कार्ड देण्यासाठी मच्छिमारांचे फॉर्म भरणे, फोटो काढणे, बोटांचे ठसे घेणे, संगणकावर माहिती भरणे इत्यादी कामांना सुरवात करण्यात आली आहे.
मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्था कफ परेड, कुलाबा येथे मच्छिमारांना बायोमेट्रिक कार्ड देण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय आयुक्त मधुकर गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच झाले. बायोमेट्रिक कार्ड देण्यासाठी आय.टी.आय., पल्लकड, केरळ, या कंपनीची पथके राज्यात दाखल झाली आहेत.
समुद्रात मासेमारी करताना प्रत्येकाकडे बायोमेट्रिक कार्ड असणे अनिवार्य आहे. बायोमेट्रिक कार्ड देण्याचा हा शेवटचा कार्यक्रम (Biometric Mop up Round) आहे. राज्यातील सर्व मच्छिमारांनी व खलाशांनी या संधीचा लाभ घेऊन बायोमेट्रिक कार्ड काढून घ्यावीत. जेणेकरुन त्यांना समुद्रात मासेमारी करताना अडचणी निर्माण होणार नाहीत असे आवाहन श्री. गायकवाड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment