मुंबई / प्रतिनिधी 22 June 2016 - दुरचित्रवाणीवरील मराठी खाजगी वाहिन्यांच्या जगतात आता माय मराठी वाहिनीचे दमदार पाऊल पडले आहे. दोन महिन्यांपूर्वी दिमाखात शुभारंभ सोहळा पार पडलेल्या या वाहिनीच्या गाण्याचेही तितक्याच दिमाखात नुकतेच चित्रीकरण पार पडले.
माय मराठी अर्थात मराठी भाषेला, संस्कृतीला आणि परंपरांना माय मानणा-या या वाहिनीने आपले गीतही त्याच धर्तीवर केले आहे. महाराष्ट्रातील समृद्ध परंपरा, सणांचा गोडवा, आणि मराठी मातीशी असलेले इमान यांचा सुंदर मिलाफ आपल्या शब्दातून गीतकार मकरंद सावंत यांनी मांडला आहे. तर राहूल रानडे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला अभिजित कोसंबी आणि आनंदी जोशी यांनी आपला सुमधूर आवाज दिला.
महाराष्ट्राचे वैभव म्हणजे इथला जाज्ज्वल्य इतिहास आणि दुश्मनांना आव्हान देत आजही मजबूतीनं उभे असलेले गडकिल्ले. या चित्रीकरणाचा भव्य समारोप झाला सागरतीरावर अभेद्य तटबंदी वागवत उभ्या असलेल्या वसईच्या मनोहर किल्ल्यावर. पारंपरिक लोकनृत्ये आणि संस्कृतीशी नाते सांगत खिळवून ठेवणारे नृत्यदिग्दर्शन करण्यात विश्वास नाटेकर यशस्वी झाले आहेत.
तर मराठी सिनेजगतातील सुहास जोशी, अनिल गवस, गायत्री देशमुख, अनिल शिंगटे, संग्राम चौघुले( माजी मि.युनिव्हर्स), रसिकराज, सरीता मेहेंदळे, चेतना भट, आशुतोष घोरपडे, विक्रम गायकवाड या आघाडीच्या कलावंतांसह शंभरहून अधिक नृत्य कलावंत या चित्रीकरणात सहभागी झाले होते. सुमारे दोनशेजणांचा चमू यशस्वीरीत्या हाताळण्यात दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर यांनी आपले कसब पणाला लावले. त्यामुळे माय मराठीचे हे गीत अल्पावधीतच रसिकांच्या ओठांवर रूळल्याशिवाय रहाणार नाही, असा विश्वास माय मराठीचे सीईओ सगुण सावंत यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment