पुणे,दि.15:अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोहोचावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
येथील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलच्या विस्तारित विभागाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सर्वश्री अनिल शिरोळे, संजय पाटील, अमर साबळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार दिप्ती चवधरी,आमदार विजय काळे, सिंबॉयसीसचे डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. सोमा राजू, डॉ. कृष्णा रेड्डी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवीन तंत्रज्ञान हे मानवी जीवनासाठी अत्यंत लाभदायक आहे. टेलीमेडीसीनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मेळघाटातील रुग्णांची तपासणी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येते. याचा मोठा फायदा तेथील आदिवासींना झाला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी राज्य शासनाची महात्मा फुले आरोग्य सेवा योजना उपयुक्त असून या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या 1200 व्याधींवर उपचार करण्यात येतात. राज्यातील सर्व डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी केले. यावेळी डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment