मुंबई / प्रतिनिधी - ओला, उबेर सहित एप बेस्ड कंपन्यांना सरकारने खुली सुट दिली असून त्यामुळे काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांवर अन्याय होत आहे, त्यामुळे ओला, उबेर वर सरकारने निर्बंध लावावेत व काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांप्रमाणे त्यांना देखील सर्व अटी लागू कराव्यात, या मागणीसाठी जय भगवान महासंघातर्फे मंगळवारी (ता.21) आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे.
जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यासंदर्भात म्हणाले, ओला उबेर या कंपन्यांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही, या कंपन्यांचे चालक कोणत्याही ठिकाणांहून प्रवाशांना घेतात, टॅक्सी चालकांसाठी ज्या प्रमाणे टॅक्सी स्टॅंड आहेत, त्याप्रमाणे त्यांना देखील स्टँडचा नियम लागू करावा. उद्याच्या आंदोलनात सुमारे पंचवीस हजार टॅक्सी चालक सहभागी होतील, असा दावा सानप यांनी केला. काळ्या पिवळ्या टॅक्सी प्रमाणे ओला व उबेर चालकांना चालकाचा ड्रेस, गाडीला मीटर, चालकाचा बिल्ला आदी सर्व बाबी बंधनकारक कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. सध्या ओला व उबेर चालक वडाप सेवे प्रमाणे शेअर सेवा पुरवतात, त्यांच्यावर बंदी घालावी, अशा विविध मागण्या बाळासाहेब सानप यांनी केल्या आहेत. सरकारला यासंदर्भात निवेदन दिलेले असून उद्याच्या आंदोलनावेळी सरकारला पुन्हा निवेदन देण्यात येईल. सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य करण्याबाबत निर्णय घेतला नाही तर येत्या पंधरा वीस दिवसात मुंबई बंद करण्याचा इशारा बाळासाहेब सानप यांनी दिला.
No comments:
Post a Comment