मलेरिया वाहक डासांच्या अळ्या सापडल्या ६९० ठिकाणी !
पाच महिन्यात ९ लाख २० हजार रुपयांची दंड वसूली
मुंबई / प्रतिनिधी - डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी १ जानेवारी ते ३१ मे २०१६ या पाच महिन्यांच्या कालावधीत डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे करण्यात आली. या अंतर्गत ३९ लाख ८७ हजार ३८७ गृहभेटी देण्यात आल्या. यामध्ये काही घरांना गरजेनुरुप एकापेक्षा अधिक वेळा भेटी देण्यात आल्या, त्या घरांचाही या संख्येत समावेश आहे.
महापालिकेद्वारे नियमित स्वरुपात केल्या जाणा-या या तपासणी दरम्यान पाच महिन्यांच्या कालावधीत ६९० ठिकाणी मलेरिया वाहक ऍनॉफिलीस डासांच्या अळ्या आढळून आल्या. तर १९६९ ठिकाणी एडिस एजिप्ताय या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणा-या डासांच्या अळ्या आढळून आल्या. ही सर्व उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात आली आहेत. तसेच डास नियंत्रणाच्या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित नियमांनुसार करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान पाच महिन्यांच्या कालावधीत ९ लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विविध रोगांवर नियंत्रण असावे व रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा म्हणून महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते, कीटकनाशक खाते यासारखे विविध विभाग अविरतपणे कार्यरत असतात. औषध फवारणी, धूम्र फवारणी, डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करणे यासारख्या विविध उपाययोजना महापालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येत असतात.
कुठे होते डेंग्यूचा प्रसार करणा-या डासांची उत्पत्ती ?
गेल्या दोन वर्षांत एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱया `एडीस इजिप्टाय' डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली होती. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणा-या या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते.
सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डेंग्यू विषाणू वाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे; घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणा-या ताटल्या (प्लेट्स), वातानुकुलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे यासारख्या विविध स्रोतांमध्ये अल्प प्रमाणात असलेल्या स्वच्छ पाण्यात देखील या डासांची उत्पत्ती आढळून आली आहे.
No comments:
Post a Comment