मुंबई, दि. 9 : यंदा राज्यात चांगल्या पावसाचे अनुमान असून या खरीप हंगामातील पिक उत्पादन वाढावे यासाठी राज्य शासनाने विशेष लक्ष पुरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सातत्याने आढावा घेऊन कृषि नियोजनाला गती दिली आहे. या हंगामात उत्तम नियोजनामुळे उत्पादन वाढेल अशी अपेक्षा आहे.
राज्यात 82 टक्के शेती ही कोरडवाहू आहे. मागील वर्षी सन 2015-16 मध्ये59.04 टक्के पर्जन्य झाले. गत वर्षात राज्यात 143.56 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 133.9लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. मागील वर्षी पर्जन्य कमी झाल्याने काही पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. परंतु कापसाच्या उत्पादनात वाढ होणे अपेक्षित आहे. यावर्षी तूर व उडीद पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. बियाणे बदलाच्या योग्य प्रमाणासाठी, सोयाबीन पेरणीसाठी, आवश्यक तेवढेच घरचे बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना आता मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक खत पुरवठ्याचे नियोजन आहे. तसेच यावर्षी 14.99लाख क्विंटल बियाणांची गरज असून 17.90 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. बी.टी. कापसाच्या 160 लाख पाकीटांची गरज असताना 200 लाख पाकीटांची उपलब्धता आहे. राज्यात ऑनलाईन कीड व रोग सर्वेक्षण प्रकल्प यशस्वीरित्या राबविल्यामुळे पंतप्रधान पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. गुण नियंत्रणाच्या कामासाठी राज्यात 395 भरारी पथकांची निर्मिती केली आहे .
बियाणे, खते व किटकनाशकांचे नमुने काढण्याच्या लक्षांकाची निश्चिती केली आहे. गावनिहाय कृषि नियोजनासाठी गावातील पीकांखालील क्षेत्राचे ऑनलाईन रिपोर्टींगचे नियोजन आहे. कोरडवाहू शेती अभियानाची अंमलबजावणी शेतकरी गटांच्या माध्यमातून करण्यासाठी कोरडवाहू शेती तंत्रावर भर देण्यात येत आहे.
खरीप हंगामातील उत्पादनात वाढ होण्यासाठी राज्य शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या प्रयत्नास शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हा खरीप हंगाम यशस्वी होणार आहे. यामुळे कृषि विकासाचा दर वृध्दींगत होण्याचे राज्य शासनाचे ध्येय पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment