मुंबई / प्रतिनिधी - केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील राज्य कामगार विमा महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या राज्य कामगार विमा योजनेचे राज्य कामगार विमा महामंडळात रुपांतर करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेचा लाभ 24 लाख कामगारांना देण्यात येतो.
महाराष्ट्र राज्यात राज्य कामगार विमा योजना 1954 पासून लागू करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील ज्या कामगारांचे मासिक वेतन 15 हजार रुपयांपर्यंत आहे अशा कामगारांना ही योजना लागू आहे. त्यासाठी कामगारांच्या वेतनातून तसेच कारखाना मालकांकडून वर्गणीच्या स्वरुपात महामंडळाकडे रक्कम जमा करण्यात येऊन या योजनेतील विमाधारकांना आर्थिक लाभ आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली असून 24 लाख नोंदणीकृत विमाधारक आहेत. राज्यात या योजनेची 13 रुग्णालये, 61 सेवा दवाखाने व 506 विमा वैद्यकीय व्यवसायी यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली जाते.
राज्य शासन आणि राज्य कामगार विमा महामंडळ अशा दुहेरी नियंत्रणामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच इतर वित्तीय आणि प्रशासकीय अडचणीही येत होत्या. केंद्र शासनानेही ईएसआय अधिनियमात सुधारणा करून राज्यस्तरीय कामगार विमा महामंडळ स्थापन करण्याची तरतूद केली होती. त्यानुसार राज्य कामगार विमा योजनेचे राज्यस्तरीय राज्य कामगार विमा महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या महामंडळासाठी पहिल्या तीन वर्षांचा पूर्ण खर्च केंद्र शासनाकडून करण्यात येणार असून त्यानंतर 90 टक्के खर्च केंद्र शासनाकडून करण्यात येईल.
No comments:
Post a Comment