मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील कामगारांना शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येणा-या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्यात यावा,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कामगार मंत्री प्रकाश महेता,कामगार राज्यमंत्री विजय देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश (मुन्ना) यादव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, कामगार विभागाचे प्रधान सचिव बलदेव सिंग, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, आरोग्य विकास विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, ग्राम विकास विभागाचे सचिव आसीम कुमार गुप्ता, कामगार आयुक्त यशवंत केरुरे, मंडळाचे सदस्य व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, म्हाडा (गृहनिर्माण विभाग), सिडको (नगर विकास विभाग),एम.आय.डी.सी. (उद्योग विभाग) तसेच बांधकाम क्षेत्रांशी संबंधित इतर सर्व विभागांनी सक्रिय सहभाग घ्यावा. त्यांच्या क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत बांधकाम आस्थापनेची नोंदणी करण्याचे व त्यावरील बांधकाम कामगारांची नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे करण्यासाठी प्रमाणित करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण, स्मार्टकार्ड देणे तसेच त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि एकंदरीत मंडळाचे दैनंदिन कामकाज जलदगतीने व पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी सर्वसमावेशक अशी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करुन हा प्रकल्प बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा असेही त्यांनी सागितले. यावेळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्यालय लवकरात लवकर स्वतंत्रपणे स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
No comments:
Post a Comment