मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेने ३१ मे २०१६ पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याची कंत्राटदारांना जी मुदत दिली होती ती नालेसफाईची मुदत संपल्यानंतर कंत्राटदारांनी नालेसफाई कामाला सुरुवात केली असल्याचे धक्कादायक वास्तव विविध ठिकाणांच्या नाल्यांना भेट दिल्यानंतर पुढे आल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेता प्रविण छेडा यांनी केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांनी ‘एच/पूर्व- एच/पश्चिम’ विभागातील नाल्यांची मुंबई कॉग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक ०२ जून, २०१६) पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार कृपाशंकरसिंह ‘एच/पूर्व- एच/पश्चिम’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा कॅरेन डिमेलो, नगरसेवक डॉ.प्रियतमा सावंत, सुनिता वावेकर, डॉ. गुलिस्ता शेख, नगरसेवक ब्रायन मिरांडा, आसिफ झकेरिया, तन्वीर पटेल, एच/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, एच/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे तसेच संबधित अधिकारी व नागरिक उपस्थित होते. वाकोला नाला, मिठी नदी (कल्पना थियटरजवळ), वांद्रे (पूर्व) येथील इंदिरानगर झोपडपट्टीजवळचा चमडावाडी नाला, गेट नं. १८ जवळील बेहरामपाडा नाला, वांद्रे (पश्चिम) शास्त्रीनगर येथील बोरन नाला, शिवशक्ती सेवा संघ, सखाराम बुवा पाटील मार्ग, सांताक्रुझ (पश्चिम) येथील गझदरबंध नाला आदी नाल्यांची मान्यवरांनी पाहणी केली.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना विरोधी पक्षनेता छेडा म्हणाले की, नालेसफाई कामामध्ये महापालिका पूर्णपणे अपयशी ठरली असून नाल्यातील फक्त तरंगता कचरा महापालिकेने काढला असून गाळ हा नाल्यामध्ये तसाच पडून असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्याचप्रमाणे मुदत संपल्यानंतर नालेसफाईच्या कामाला कंत्राटदारांनी सुरुवात केली असल्याचे विविध ठिकाणच्या पाहणीवरुन दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे पश्चिमच्या शास्त्रीनगर येथे नाला रुंदीकरणासाठी १६ झोपडया तोडण्यात आला असून त्यांना पात्रतेप्रमाणे घरे उपलब्ध करुन देण्याची सूचना त्यांनी यावेळी महापालिका अधिकाऱयांना केली.
No comments:
Post a Comment