मुंबई / प्रतिनिधी दिनांक 22-- मुंबई शहरातील उपनगरीय लोकल सेवा सलग दोन दिवस विस्कळीत होऊन लाखो प्रवाशांना त्रास झाला तरी मुंबईकर असलेल्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणी चकार शब्द देखील काढला नाही, त्यामुळे रेल्वेमंत्री नेमके कुठे हरवलेत हे पाहण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज आपण यांना पाहिलत का असा बोर्ड घेऊन चर्चगेट येथे अभिनव आंदोलन करण्यात आले व प्रभूंचा शोध घेण्यात आला.
सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या या आंदोलनात पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली रंजना माने व मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सोमवारी रेल्वेच्या बॆटर्या चोरीला गेल्याने पश्चिम रेल्वे ठप्प झाली तर मंगळवारी पावसामुळे मध्य रेल्वे बंद पडली. पारसिक बोगद्याची संरक्षक भिंत ढासळल्याने जलद मार्गावरील सेवा बंद झाली. या सर्व प्रकारामुळे लाखो प्रवाशांना मनस्ताप झाला. मात्र रेल्वेमंत्री असलेल्या प्रभूंनी याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. प्रभू यांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याची माहिती सुरेखा पेडणेकर यांनी दिली.
रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रेल्वेची बॅटरी चोरीला गेली,त्यामुळे रेल्वे ची सेवा विस्कळीत झाली, प्रवाश्याचे अतोनात हाल झाले. पारसिक बोगद्याच्या संरक्षक भिंतीची ढासळती स्थिती पाहून प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून जाळी बसवायची गरज होती मात्र आपल्याच तंद्रीत असलेल्या रेल्वे प्रशासनावर प्रभूंचा वचक नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला.
No comments:
Post a Comment