महापालिका प्रशासनाचे आवाहन
मुंबई / प्रतिनिधी - धारावी येथील मुख्याध्यापक नाला आणि धोबीघाट नाला यांची स्वच्छता योग्यरित्या होण्याकरीता या नाल्यांवर असलेली दोन्ही प्रार्थनास्थळे हटविणे व्यापक नागरी हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. सदर ठिकाणी धार्मिक स्थळांच्या निष्कासनाची कारवाई पुनश्च करावयाची असून व्यापक नागरी हित लक्षात घेऊन या भागातील विविध पक्ष, संघटना, नागरिक यांनी या कारवाईस सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महापालिकेच्या एफ/उत्तर विभागातील गांधी मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व इतर सखल ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचण्याच्या घटना घडतात. एफ/उत्तर विभागातून पाण्याचा निचरा जी/उत्तर विभागामध्ये होत असतो. सदर पाणी हे मुख्याध्यापक नाला व धोबीघाट नाला येथून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असते. दोन्ही नाल्यांवर धार्मिकस्थळे असल्यामुळे सदर नाल्यांची साफसफाई करता येत नाही. त्यामुळे दरवर्षी धारावीमध्ये तसेच एफ/उत्तर क्षेत्रातील गांधी मार्केट व आजुबाजूच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात पावसाळ्यामध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. त्याकरीता महापालिकेकडून यापूर्वी दिनांक २६ मे, २०१६ व दिनांक ०२ जून, २०१६ रोजी मरिअम्मा व महाकाली मंदिरांच्या निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली होती. त्याकरीता पोलिस उप आयुक्त, अभियान, मुंबई यांच्या कार्यालयाकडे महापालिका प्रशासनाने विहित शुल्क भरले व त्यानुसार मोठय़ा संख्येने पोलिस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्यात आलेला होता.
दिनांक २६ मे, २०१६ रोजी निष्कासनाची कारवाई सुरु असताना काही संघटना / संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे सदर निष्कासन कारवाई स्थगित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा दिनांक ०२ जून, २०१६ रोजी या दोन्ही धार्मिकस्थळांच्या निष्कासनाकरीता पोलिस उप आयुक्त, अभियान, मुंबई यांचेकडून उपलब्ध पोलिस बंदोबस्त तसेच महापालिकेचे मनुष्यबळ, वाहने, अभियंते यांच्या सहकार्याने निष्कासनाची कार्यवाही करावयाचे नियोजित होते. परंतु, धारावी पोलिस ठाणे यांनी महापालिका प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे कळविले की, सदर परिसर संवेदनशील असून धार्मिक तेढ निर्माण होऊन परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. लेखी स्वरुपात हे निवेदन प्राप्त झाल्याने कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, याकरीता सदर निष्कासनाची कारवाई त्यादिवशी रद्द करण्यात आली. सदर ठिकाणी धार्मिकस्थळांच्या निष्कासनाची कारवाई पुनश्च करावयाची आहे. नालेसफाईची आवश्यकता तसेच व्यापक नागरी हित लक्षात घेऊन या भागातील विविध पक्ष, संघटना, नागरिक यांनी या कारवाईस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment