मुंबई / प्रतिनिधी - संपूर्ण जगभर २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करीत आहे. भारतात प्राचीन काळापासून योगचे धडे दिले जात होते. योग मानसिक व शारीरिकदृष्टय़ा स्थैर्य मिळविण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका शारीरिक शिक्षण विभाग व ईशा फाऊंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग, महापालिका शाळा येथे आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षणात आज (दिनांक २१ जून, २०१६) सकाळी सहभागी झाल्यानंतर महापौर आंबेकर उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होत्या. आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षण सादरीकरणाचा मुख्य कार्यक्रम महापालिकेच्या ना. म. जोशी मराठी शाळा सभागृह, करीरोड येथे झाला. यावेळी विशेष उपस्थिती मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची होती. महापौरांसह शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांनी सुमारे दिड तास योग प्रशिक्षणात सहभागी होऊन योग केले.
दिनांक २१ जून, २०१६ रोजी ‘द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिन’ बृहन्मुंबई महानगरपालिका व ईशा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये साजरा करण्यात आला. महापालिकेच्या २६७ क्रीडा संकुलांमधून तसेच शाळांमधून सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना योगचे शिक्षण देण्यात आले. महापालिकेच्या ७ हजार ५९३ शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकारी तसेच १ हजार ४१५ शिक्षकेतर कर्मचारी व इतर बाह्य संस्थेचे प्रतिनिधींनी या योग प्रशिक्षणात सहभाग नोंदविला.
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाल्या की, जागतिकीकरणात व स्पर्धेच्या युगात नागरिक आपले सर्वस्व पणाला लावीत असून स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देण्यासाठी नागरिकांकडे वेळ नाही. पण धकाधकीच्या जगात शारीरिक व मानसिक दृष्टय़ा सक्षम होण्यासाठी योग आवश्यक आहे. बृहन्मुंबईच्या सर्व शाळांत योगचे धडे नियमित स्वरुपात कसे देता येईल, याबाबत शिक्षण विभागाने विचार करावा, असे महापौरांनी यावेळी सांगितले. महापालिकेचा विद्यार्थी हा कोणत्याही क्षेत्रात कमी पडू नये यासाठी टॅबसह व्हर्च्युअल क्लासरुमद्वारे शिक्षण दिले जात आहे. खासगी शाळेत ज्या सुविधा दिल्या जात नाहीत, त्यापेक्षा अधिक व आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा महापालिका पुरवित आहे. यासाठी प्रशासनाच्या नव्या कल्पना साकारण्यासाठी आपण प्रशासनासोबत असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.
शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांनी सांगितले की, योगाचे महत्त्व मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. योगाद्वारे बालमनावर चांगले संस्कार करणे शक्य होईल, यासाठी महापालिकेच्या शाळेत योग शिक्षण दिल्यानंतर विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. उप आयुक्त (शिक्षण) रणजित ढाकणे यांनी सांगितले की, मानव प्रकृतीसाठी योग अत्यंत आवश्यक नि उपयोगाचा असून महापालिका शाळांत योग शिक्षण देण्याबाबत पालिका प्रशासनातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. योग शिक्षण परिपाठ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचेही ढाकणे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात योगचे प्रशिक्षण देण्यात आले.
No comments:
Post a Comment