मुंबई, दि. 9 : ब्रिटनच्या सहकार्यातून महाराष्ट्रात आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली. युके ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटतर्फे हॉटेल ताज लँडस् एन्ड येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यातील आरोग्य सेवांच्या बळकटीकरणाविषयी चर्चा झाली. त्यावेळी डॉ. सावंत बोलत होते. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचे अध्यक्ष सर माल्कम ग्रँट यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.
आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णाचे प्राण वाचावे म्हणून उपलब्ध वेळेतील केवळ ‘गोल्डन अवर’च नव्हे तर ‘प्लॅटिनम मिनिटस्’चाही सदुपयोग झाला पाहिजे म्हणून गतिमान व सुसज्ज बाईक ॲम्बुलन्सबाबत वैद्यकीय सेवकांना प्रशिक्षण देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. ब्रिटन व महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रातील सहकार्याविषयी यावेळी सकारात्मक चर्चा झाली, असेही
डॉ. सावंत यांनी सांगितले.
भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडत आहेत. भविष्यातही या क्षेत्रातील विविध संस्था, कंपन्या यांना प्रोत्साहन देत सेवांची वृद्धी करण्यावर शासनाचा भर आहे. राष्ट्रीय आरोग्य योजना संस्थेतर्फे आरोग्य सेवा कंपन्या व संस्था यांच्या सहकार्याने अनेक प्रकल्प भारतभर राबविले जात आहेत. ब्रिटनशी आरोग्य सेवा क्षेत्रातील सहकार्यामुळे या सेवांचा दर्जा उंचावून भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात आमुलाग्र बदल होतील असा विश्वासही डॉ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment