मुंबई / प्रतिनिधी - संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने नुकतीच न्यूयॉर्क येथे ‘महानगरांतून एड्स साथीचे उच्चाटन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय उच्चस्तरीय परिषद आयोजित केली होती. भारतातून मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना या परिषदेसाठी खास निमंत्रित करण्यात आले होते. आंबेकर यांनी न्यूयॉर्क येथील परिषदेत मुंबईतील एचआयव्ही / एड्सची समस्या व त्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती सर्व प्रतिनिधीं समोर मांडली.
सन २०२० पर्यंत एचआयव्ही / एड्स उच्चाटन करण्यासाठी महापालिका प्रशासन करीत असलेली कार्यवाही, एचआयव्ही बाधितांना एआरटी उपचार उपलब्ध करुन देणे व ९० टक्के एचआयव्ही बाधितांना आजार आटोक्यात आणणे, हे आमचे ध्येय राहील, असेही महापौरांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरातील एचआयव्ही निर्मुलनासाठी पुढील ५ वर्षांत अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय उपाययोजना केल्या जातील, असेही महापौरांनी यावेळी नमूद केले.
या परिषदेस आशिया, आफ्रिका, अमेरिका यामधील ३० महानगरांचे महापौर / मंत्री उपस्थित होते. ब्राझिल, कांगो, घाना, मेक्सिको, पनामा, दर्बन, न्यूयॉर्क, हो ची मीन अशा अनेक शहरांचे / देशांचे प्रतिनिधी या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या सर्व प्रतिनिधींनी एचआयव्ही / एड्स नियंत्रणातील त्यांचे अनुभव, आव्हाने व उपाय यावर चर्चा केली. महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर याही महापौरांसमवेत परिषदेत सहभागी झाल्या होत्या.
No comments:
Post a Comment