रस्ते अपघातातील जखमींवर उपचारासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना
मुंबई, दि. 7 राज्यात सध्या सुरू असलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची मुदत ऑक्टोबर 2016 मध्ये संपत असून या जुन्या योजनेत लाभार्थ्यांना उपयुक्त ठरतील असे बदल करून नव्याने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात येणार आहे. रस्त्यावरील अपघातग्रस्तांसाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परीषदेत दिली.
आरोग्यमंत्री डॉ. सावंत यासंदर्भात अधिक माहिती देतांना म्हणाले की, राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत दि. 1 ऑक्टोबर 2016 रोजी संपत आहे. त्यामुळे राज्य शासनाने या जुन्या योजनेच्या धर्तीवर नविन उपचारांचा समावेश असलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये विमा संरक्षणाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून प्रती वर्ष प्रती कुटुंब दीड लाख रुपयांऐवजी आता नव्या योजनेत दोन लाख रुपयांची मर्यादा वाढविण्यात आली आहे. मुत्रपिंड प्रत्यारोपनासाठीची (किडनी ट्रान्सप्लांट) मर्यादा अडीच लाख रुपयांवरून आता तीन लाख रुपये एवढी करण्यात आली आहे.
जीवनदायी योजनेत समाविष्ट आजारांची (प्रोसिजर्स) संख्या 971 आहे नव्या योजनेत ही संख्या 1100 एवढी करण्यात आली आहे. नव्या योजनेत स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू वरील उपचाराचा खर्च तसेच सिकलसेल, ॲनिमिया, लहान मुलांचे आजार, वार्ध्यक्याचे आजार यांचा समावेश करण्यात आला आहे. 127 पाठपुरावा सेवांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.
या विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीची निवड निविदा मागवून करण्यात येणार आहे. नव्या योजनेमध्ये सहभागी होण्याऱ्या रुग्णालयांसाठी खाटांच्या संख्यांची मर्यादा 50 वरून 20 इतकी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी, डोंगराळ भागातील रुग्णालये देखील योजनेत समाविष्ट होऊ शकतील. राज्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी अंगीकृत रुग्णालये संख्येची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रॉमाकेअर,ऑन्कॉलॉजी इत्यादी विशेषज्ञ सेवांसाठी प्राधान्याने रुग्णालये अंगीकृत करण्यात येतील. आवश्यकता भासल्यास अपवादात्मक परिस्थितीत सीमावर्ती राज्यातील शासकीय रुग्णालयांना एका वर्षासाठी अंगीकृत करण्यात येईल.
पिवळे, केशरी शिधापत्रिका तसेच मतदार कार्ड, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना यांचा उपयोग लाभार्थी कुटुंबाची ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. राज्यातील 2 कोटी 26 लाख दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक कुटुंब, शासकीय आश्रमशाळा, अनाथालय, वृध्दाश्रम, 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी तसेच पत्रकारांचादेखील समावेश या नव्या योजनेत करण्यात आला आहे. जे सहभागी रुग्णालये नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर आर्थिक दंडाची तरतूद देखील नव्या योजनेत करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिली.
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना
राज्यामध्ये रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णांवर पहिल्या गोल्डन अवर मध्ये तातडीने उपचार व्हावेत यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. सावंत यांनी यावेळी दिली. या योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींवर पहिले तीन दिवस मोफत उपचार करण्यात येतील. त्यानंतर त्या जखमींच्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना आवश्यकता वाटल्यास शासकीय रुग्णालय, खासगी किंवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले जाईल. महात्मा फुले जन आरोग्ययोजनेसाठी जे निकष आहेत तेच या योजनेसाठी लागू राहतील. राज्यातील 200 ट्रॉमाकेअर रुग्णालये या योजनेत सहभागी केले जातील. या योजनेतील खर्चाची मर्यादा 30 हजार एवढी आहे, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
दृष्टीक्षेपात योजना-
· महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये विमा संरक्षणाच्या रकमेत वाढ
· प्रती वर्ष प्रती कुटुंबास उपचार खर्चाची मर्यादा आता 2.00 लाख रुपये
· मुत्रपिंड प्रत्यारोपनासाठीची (किडनी ट्रान्सप्लांट) मर्यादा तीन लाख रुपये
· समाविष्ट आजारांची (प्रोसिजर्स) संख्या 1100
· 127 फॉलोअप प्रोसिजर्सचा समावेश
· स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, सिकलसेल, ॲनिमिया, लहान मुलांचे आजार, वार्ध्यक्याचे आजारवरील उपचार खर्चाचा समावेश
· सहभागी रुग्णालयांसाठी खाटांच्या संख्यांची मर्यादा 50 वरून 20 इतकी कमी करण्यात आली
· ट्रॉमाकेअर, ऑन्कॉलॉजी यासाठी स्वतंत्र रुग्णालये समाविष्ट करणार
· बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेत रस्ते अपघातातील जखमींवर उपचार
· जखमींवर पहिले तीन दिवस मोफत उपचार
· राज्यातील 200 ट्रॉमाकेअर रुग्णालये या योजनेत सहभागी
No comments:
Post a Comment