मुंबई दि. २१ : राज्याच्या विविध भागात १ जुलै २०१६ रोजी होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात शासकीय, निमशासकीय अधिकारी- कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी- कर्मचारी,शाळा- महाविद्यालयांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार असल्याने त्यांचा १ जुलै २०१६ रोजी दुपारी १ वाजेपर्यंतचा वेळ हा शासकीय कामकाजाचा भाग गृहित धरला जाईल. या वेळेत संबंधित अधिकारी- कर्मचारी यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपणात भाग घेणे, स्वंयसेवक म्हणून काम करणे, लोकांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित करणे, यासाठी आवश्यक ते सहाय्य करणे या बाबी अपेक्षित असून ते ज्या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी गेले आहेत त्या ठिकाणी लावलेल्या झाडासोबतचा एक सेल्फी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी आज मुख्यमंत्री, सर्व पालकमंत्री आणि सर्व सचिव यांच्यासमोर दि. १ जुलै २०१६ रोजी होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले, त्यावेळी ते बोलत होते. जी व्यक्ती झाड लावून आपल्या आयुष्यातील आठवणींचे जतन करू इच्छिते, पण त्याच्याकडे झाड लावण्यासाठी वेळ नाही, अशांसाठी मोबाईल ॲपद्वारे पैसे भरून झाड लावण्याची व्यवस्था वन विभागाने विकसित करावी. त्या बदल्यात त्या व्यक्तीस ग्रीन सर्टिफिकेट द्यावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वन विभागाने हाती घेतलेल्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे कौतूक केले. या कार्यक्रमासाठी सर्व पालकमंत्री आणि पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यात उपस्थित राहून वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे व आपला ही ‘सेल्फी विथ ट्री’ संदर्भातील फोटो वन विभागाकडे पाठवावा असेही सांगितले.
वृक्ष लागवड व्हावी लोकचळवळ
वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा दुपारी १ पर्यंतचा वेळ शासकीय कामकाजाचा भाग समजण्यात यावा , तसे आदेश निर्गमित करण्यात यावेत अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, राज्यात १ जुलै २०१६ रोजी केलेला दोन कोटी वृक्ष लागवडीचा केलेला संकल्प हा केवळ शासकीय उपक्रम नाही. ही एक लोकचळवळ व्हावी या हेतूने वन विभागाने हे महत्वाकांक्षी पाऊल टाकले आहे.. राज्यात सध्या २० टक्के वनक्षेत्र आहे. ते राज्य आणि राष्ट्रीय वननीतीनुसार ३३ टक्क्यांपर्यंत वाढवायचे असेल तर ४०० कोटी वृक्ष लावण्याची गरज आहे. हे काम एकट्या वन विभागाच्या जमीनीवर किंवा वन विभागातर्फे पुर्णत्वाला जाईल असे नाही, शासनाबरोबर लोकसहभागातून खाजगी, सार्वजनिक व शासकीय जमीनीवर ही लागवड करावी लागेल. यावर्षी म्हणजे २०१६ ला २ कोटी, २०१७ ला ३ कोटी, २०१८ ला १० कोटी आणि २०१९ ला २५ कोटी असे मिळून चार वर्षात ३८ कोटी व ग्रामपंचायतींच्या जागांमध्ये १२ कोटी असे एकूण ५० कोटी वृक्ष लागवडीचा वन विभागाचा मानस आहे. यासाठी राज्याच्या २७ हजार ग्रामपंचायती नर्सरीयुक्त करावयाचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. वृक्ष लावण्याबरोबर वृक्ष जगवण्याला ही विभागाने प्राधान्य दिले असल्याचे सांगतांना वनमंत्र्यांनी ८० ते ९० टक्के झाडं जगवण्यासाठी विभाग प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत २०० झाडामागे १ कुटुंबाला रोजगार देण्यात येणार आहे. तसेच लावलेल्या वृक्षांची अक्षांश- रेखांशासह संगणकप्रणालीत नोंद होत आहे. रेल्वे , संरक्षण मंत्रालयाच्या जागा,राष्ट्रीय महामार्ग, टेकड्या, रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी झाडं लावण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment