मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम 2004 मधील कलम 2 (घ) नुसार एखाद्या लोकसमुहास अल्पसंख्याक लोकसमूह म्हणून घोषित करण्याच्या शासनाच्या अधिकारानुसार ज्यू (Jew) धर्मीय लोकसमुहास अल्पसंख्याक लोकसमूह घोषित करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी (झोराष्ट्रीयन) व जैन या धार्मिक अल्पसंख्याक लोकसमुहांना महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर 2006 मध्ये धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केले होते. त्याच धर्तीवर राज्यातील ज्यू धर्मीय लोकसमुहाला देखील अल्पसंख्याक लोकसमूह घोषित करण्यात यावे, अशी ज्यू धर्मीयांची मागणी होती. इंडियन ज्युईश फेडरेशनने शासनास दिलेल्या निवेदनानुसार ज्यू धर्मीयांची राज्यातील लोकसंख्या दोन ते अडीच हजार इतकी अत्यल्प आहे.
इतर अल्पसंख्य धर्माच्या समुदायाप्रमाणे ज्यू धर्मीयांची जनगणना स्वतंत्रपणे ज्यू धर्मीय म्हणून दर्शविण्यात आलेली नव्हती. जनगणना-2011 नुसार इतर धर्मीयांमध्ये ज्यू धर्मीयांचा एकत्रितपणे समावेश करण्यात आला असल्याने राज्यातील ज्यू धर्मीयांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. आजच्या निर्णयामुळे राज्यातील ज्यू धर्मीय लोकसंख्येची गणना करणे शक्य होणार आहे. तसेच अल्पसंख्याकांच्या विकासासाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ ज्यू धर्मीयांना घेता येणार आहे.
No comments:
Post a Comment