धोकादायक आंबेडकर भवन पहाटे अंधारात तोडले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 June 2016

धोकादायक आंबेडकर भवन पहाटे अंधारात तोडले

आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष 
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई / अजेयकुमार जाधव 

Saturday, June 25, 2016

आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या दादर गोकुळदास पास्ता रोड वरील आंबेडकर भवन पहाटे सकाळी पाडण्यात आले. पालिकेने आंबेडकर भवनांची इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होते. परंतू इमारत पाडण्याचे काम पहाटे ३ वाजता करण्यात आल्याने याबाबत संशय निर्माण झाल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला असून भोईवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी "दि पिपल्स  इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट " स्थापन केला आहे. या ट्रस्टची गोकुळदास पास्ता लेन, दादर (पु), मुंबई येथील डॉ बाबसाहेब आंबेडकर भवन ही इमारत धोकादायक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे. तशी बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा कलम ३५४ अंतर्गत १ जून २०१६ रोजी ट्रस्टला नोटीस देण्यात आली होती. या नोटिसीनुसार आंबेडकर भवनातील सर्व बांधकामे नोटीस प्राप्त झालेल्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत निष्कासित करणे संस्थेला बंधनकारक होते. शनिवारी (२५ जून) पहाटे ३ वाजता आंबेडकरी जनतेला थांगपत्ता लागू न देता आंबेडकर भवनावर बुलडोझर फिरवण्यात आला. यामध्ये बाबासाहेबांची बुद्ध भूषण प्रेस, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले आहे. 


तोडक कारवाई होत असल्याची माहिती मिळताच रिपब्लिकन सेना, भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी व आंबेडकरी जनतेने आंबेडकर भवनकडे कूच केली.आंबेडकर भवन तुटलेले पाहून संतप्त आंबेडकरी अनुयायांनी भोईवाडा पोलीस ठाण्यासमोर शेकडोंच्या संख्येने आंदोलन केले. प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थिती निदर्शनास आणल्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. 

पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम १४२,१४३,१४४,१४६,१४७,१४८,१४९,४५२,३८०,३९५,४२७,३४ नुसार (एफआयआर नंबर - २०८/१६) श्रीकांत गवारे, योगेश व्हरांडे, नागसेन सोनारे, अभय बांबोले, बोधवडे, रत्नाकर गायकवाड यांच्यासह ४०० ते ५०० अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून प्रिंटिंग प्रेस व रिपब्लिकन सेनेच्या कार्यालयावर घातक शस्त्रांनी हल्ला करून अंदाजे १० लाख रुपयाचे सामान व रोख रक्कम चोरल्या व तोडक कारवाई करून मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आंबेडकर भवन पाडल्याचे पडसाद महाराष्ट्रात ठिक ठिकाणी उमटू लागले असून तोडकी कारवाईचा निषेध केला जात आहे. 

१७ मजली आंबेडकर भवन उभारणार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि पिपल्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या जागेवर ७० कोटी रुपये खर्च करून १७ माजली आंबेडकर भवन उभारले जाणार आहे. आंबेडकर भवनावाच्या कोनशिला उद्घाटनाचा कार्यक्रम डॉ. आंबेडकर यांच्या जयंती दिनी भारत व स्काऊट गाईड सभागृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. मुख्यमंत्र्यानी या कार्यक्रमात आंबेडकर भवन उभारण्यास १० कोटी रुपयांचा निधी जाहिर केला आहे. १७ मजली सुसज्ज अश्या आंबेडकर भवनात वाचनालय, ध्यान विपश्यना केंद्र, अद्ययावत सामाजिक सांस्कृतिक सभागृह, रंगमंच, कम्युनिटी हॉल, प्रशिक्षण आणि कार्यशाळा केंद्र, कायदा सहाय्य केंद्र, अभ्यास संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

फोटो लिंक - http://bpcorg.blogspot.in/2016/06/photo.html

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad