बाबासाहेबांची चैत्यभूमी केव्हाही कोसळू शकते - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 June 2016

बाबासाहेबांची चैत्यभूमी केव्हाही कोसळू शकते

बौद्ध महासभेतील मतेभेदाने चैत्यभूमीचा पुनर्विकास रखडला 
मुंबई / अजेयकुमार जाधव
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या संबंधीत वास्तु, संस्था, ग्रंथालये, स्मारके झळाळत असताना बाबासाहेबांवर ज्या 
दादरच्या हिंदू स्मशान भूमीत अत्यंसंस्कार झाले, त्या ठिकाणी पन्नास वर्षापूर्वी बाबासाहेबांचे स्मारक म्हणून उभारलेली चैत्यभूमी (स्तूप) जीर्ण झाली आहे. चैत्यभूमी (स्तूप) जीर्ण झाल्याने केव्हाही कोसळू शकते. नवा स्तूप उभारण्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे परंतू आंबेडकर बंधुंमधील कोर्टकचेऱ्यामुळे आणि बौद्ध महासभेतील वादामुळे चैत्यभूमीचे काम गेल्या दहा वर्षापासून रखडले आहे. 


बाबासाहेबांचे ६ डिसेंबर १९५६ ला महानिर्वाण झाले. बाबासाहेबांवर दादरच्या हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी दरवर्षी १४ एप्रिल व ६ डिसेंबरला लाखो भीम अनुयायी येवू लागले. दरम्यान भीम अनुयायांना बाबासाहेबांना वंदन करता यावे म्हणून बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेब (यशवंतराव) यांनी महू ते दादर अशी भीमज्योत काढून निधी जमा केला. आणि जमा निधीमधून १९६८ साली चैत्यभूमी (स्तूप) बांधली. आज याच चैत्यभूमीमध्ये रोज हजारो तसेच १४ एप्रिल व ६ डिसेंबरला लाखोच्या संखेने भीम अनुयायी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. 

चैत्यभूमी समुद्र किनारी असल्याने गेली पन्नास वर्षे समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याशी चैत्यभूमीचा स्तूप सामना करत आहे. १९९४ मध्ये दादासाहेब रुपवते यांनी चैत्यभूमीच्या पुनर्विकासाची कल्पना मांडली. २००० मध्ये राज्य सरकारने २५ कोटी मंजूर केले. शशी प्रभू अँड असोसिएटस यांनी आराखडा बनवला आणि मुंबई महापालिकेच्या देखरेखेखाली काम सुरु झाले. पहिल्या टप्प्यात २२ मीटर उंच तोरण गेट, दुसऱ्या टप्प्यात अशोक स्तंभ उभारण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात नवा स्तूप उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र स्तुपाला भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी हात लावू देत नाहीत. त्यामुळे २००६ पासून काम बंद आहे. 

राज्य सरकारने चैत्यभूमीच्या पुनर्विकासासाठी मंजूर केलेला निधी असला तरी बौद्ध महासभेतील आपसातील वादामुळे गेल्या १० वर्षात चैत्यभूमीचा पुनर्विकास झालेला नाही. समुद्राच्या खाऱ्या हवेशी सामना करणारी चैत्यभूमी आता जीर्ण झाली आहे. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याने स्तूपाचे बीम आणि कॉलमचे स्टील पार गंजून गेले आहे. याच चैत्यभूमीच्या स्तुपामधील खोल्यामध्ये बौद्ध भिख्खु निवासाला असतात. १४ एप्रिल आणि ६ डिसेंबर ला २५ ते ३० लाख भीम अनुयायी आणि मंत्री व अतिमहत्वाच्या येत असतात. अशा परिस्थिती काही अपघात घडल्यास मोठी हानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS