मुंबई, दि. १५: लिंगायत समाजातील उर्वरीत १२ पोटजातींना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याबाबत लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. कामगार राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या विनंतीवरुन व सामाजिक न्याय राज्यमंत्री कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात काल यासंदर्भात बैठक झाली,त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार मनोहर पटवारी, लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल रूकारे, समन्वयक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, गुरुनाथ बडुरे, सौ. सरलाताई पाटील, राजेंद्र मुंडे, उदय चौंदा, शिवानंद पाटील, श्रीशैल बनशेट्टी यांच्यासह संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री देशमुख यावेळी म्हणाले की, लिंगायत समाजातील १४ पोटजातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. पण तरीही या समाजातील अजून १२ पोटजाती आरक्षणाच्या लाभापासून वंचित असून त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात होणे आवश्यक आहे. लिंगायत, विरशैव लिंगायत, लिंगायत रेड्डी, लिंगायत कानोडी, लिंगडेर / लिंगधर, लिंगायत शिलवंत, लिंगायत दीक्षावंत, लिंगायत पंचम,लिंगायत चतुर्थ, हिंदू लिंगायत, हिंदू विरशैव, लिंगायत तिराळी या पोटजातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याबाबत राज्य शासनामार्फत राज्य मागासवर्ग आयोगाकडे शिफारस करण्यात आली आहे. त्यांच्याकडून यासंदर्भात लवकरात लवकर अहवाल प्राप्त करुन घेऊन उर्वरीत पोटजातींनाही ओबीसीमध्ये समाविष्ट करुन या समाजाला न्याय देण्यात यावा, असे ते म्हणाले.
उर्वरीत पोटजातींना ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी हा प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येईल. राज्य मागासवर्ग आयोगाकडून लवकरात लवकर अहवाल मागवून उर्वरीत पोटजातींना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्यमंत्री कांबळे यांनी दिली.
No comments:
Post a Comment