मुंबई (प्रतिनिधी) 22 june 2016 : शिवसेनेचे आमदार व गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आरे येथे व्यायामशाळा बांधली आहे. आरेतील आदिवासींना सोयी सुविधा देण्याच्या नावाखाली सुमारे २० एकर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. वास्तविक त्यांना ३५० मीटर जागा मंजूर झालेली आहे. परंतु वायकर यांनी नियम तोडून जास्त बांधकाम तसेच मंजूर जमिनीपेक्षा जास्त जमीन ताब्यात घेतली आहे. त्यांनी बांधलेला पहिला मजला ही अनधिकृत आहे. आरे ने वारंवार म्हाडाशी पत्र व्यवहार करून ही वायकर यांनी आपल्या मंत्री पदाचा गैरवापर करून अतिक्रमणाचे काम सुरूच आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
ते पुढे म्हणाले की ३५० मीटर जागा मंजूर झालेली असताना अनधिकृत पहिला मजला तसेच स्टीम व सोना बाथ आणि ३० ते ३५ खोल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याच बरोबर त्यामागील सुमारे २० एकर जमिन ही ताब्यात घेतली आहे. त्याची किंमत २० ते २५ करोड एवढी आहे. तसेच ३ वर्षे पेक्षा जास्त ऑडिट झालेली सामाजिक संस्थाच अशा प्रकारचे उपक्रम राबवू शकते परंतु नोंदणीकृत संस्थाला काम दिलेली नसून रवींद्र वायकर यांच्या पत्नीच्या संबंधित शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्थेला काम दिले गेले आहे. ही संस्थां नोंदणीकृत ही नाही. या संस्थेंत त्यांची पत्नी व नातेवाईक आहेत.
संजय निरुपम म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पत्र देणार आहोत आणि रवींद्र वायकर यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत. तसेच लवकरात लवकर वायकर यांच्या वर कारवाई करावी. एफआयआर दाखल करावी तसेच अनधिकृत बांधकाम पाडून टाकावे, अशी आमची मागणी आहे. तसेच आम्ही लोकआयुक्तालयात ही जाणार आहोत, असे संजय निरुपम म्हणाले.
आदिवासी विकासाच्या नावाखाली गैरप्रकारची कामे केली जात आहेत. आरेने म्हाडाला वारंवार संबंधित बांधकाम व जागेवरील अतिक्रमण याबाबत पत्र व्यवहार केला तरी ही कारवाई झाली नाही. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर असल्यामुळे आणि संबंधित खाते वायकर यांच्याकडे असल्यामुळे आत्तापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. रवींद्र वायकर हे आपल्या मंत्री पदाचा दुरुपयोग करून अजून एक मातोश्री व सुप्रीमो क्लब तयार करत आहेत. भाजपच्या मंत्र्यां नंतर आता शिवसेनेच्या मंत्र्यांचे भ्र्रष्टाचार बाहेर येत आहेत. आरे येथे विकासाला विरोध करणारे कशा पद्धतीने आदिवासी नाव पुढे करून शिवसेनेचे नेते जमिनीची लूट करत आहेत, हे स्पष्टपणे दिसून येत आहे, असे संजय निरुपम म्हणाले.
No comments:
Post a Comment