मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) ः राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या अपंगांच्या विशेष शाळा आणि कर्मशाळेतील कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना आणि उपदान योजना लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज मंत्रालयात दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आपल्या दालनात पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते.
राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत संचालित अपंगांच्या अनुदानित ६४३ विशेष शाळा आणि ८६ कर्मशाळा कार्यरत आहेत. आज मंत्रिमंडळाने आमच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्यामुळे तब्बल एक हजार ४६ कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना, सेवा निवृत्ती योजना, तसेच कौटुंबिक निवृत्ती योजना आदी योजनांचा लाभ मिळणार आहे. दिनांक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत रूजू झालेल्या व शंभर टक्के अनुदान प्राप्त असलेल्या अपंगांच्या कर्मशाळा आणि संलग्न वसतिगृहातील पूर्णवेळ कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि उपदान योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही बडोले यांनी स्पष्ट केले.
दिनांक १० ऑगस्ट १९९० रोजी आज अखेर एकूण २०६ कर्मचारी निवृत्त झालेले असून त्यांच्या सेवा निवृत्ती वेतनासाठी तसेच उपदानासाठी आवश्यक निधीलाही मंजूरी मिळाली आहे. उर्वरित सेवेत असलेल्या ६०७ कर्मचाऱ्यांना ते नियत वयोमानानुसार जेव्हा सेवानिवृत्त होतील, त्या त्या वेळेच्या वेतन आयोगाच्या लाभाप्रमाणे त्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाचा व उपदानाचा लाभ देण्यात येईल असेही बडोले म्हणाले.
No comments:
Post a Comment