मुंबई / प्रतिनिधी - इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक साकारण्यात येणार असल्याने मिलच्या जागेवर स्मारकासाठी आरक्षण टाकण्यात आले असले तरी चैत्यभूमीवरील आरक्षण बदलण्यात आले आहे. मुंबईचा सन २०१४-३४चा सुधारित आराखडा जनतेच्या हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध झाला आहे. या विकास यात शहराच्या ‘आयसी २७’ या तक्त्यात चैत्यभूमीचे आरक्षण बदलण्यात आले आहे.
नव्या पुनर्रचित विकास आराखडय़ांतर्गत चैत्यभूमीचे आरक्षण बदण्यात आले आहे. या जागेवर चक्क इतर सामाजिक सुविधा असे आरक्षण टाकण्यात आले आहे. चैत्यभूमी हे तमाम आंबेडकरी जनतेसाठी महत्त्वाचे प्रेरणास्थळ आहे. परंतु ही ओळख नवीन विकास आराखडयात पुसण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले आहे.
दादरमधील शिवसेना भवनाची वास्तू ज्या जागेवर उभी आहे त्या जागेचे आरक्षण हे ‘पब्लिक घरे-पीएच’असे होते. ते बदलून शिवसेना भवन असे वास्तूनुसार टाकण्यात आले आहे. परंतु चैत्यभूमी ही वास्तू अनेक वर्षापासून असतानाही त्यावर चैत्यभूमी असे आरक्षण ठेवण्याऐवजी ‘इतर सामाजिक सुविधा’ असे करत थेट आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला आहे.
महापौर निवासाच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवण्याच्या हालचाली सुरू असतानाच महापौर निवासाच्या जागेचे आरक्षणही बदलण्यात आले आहे. महापौर निवासाच्या जागेचे मूळ आरक्षण हे रहिवासी वापर असे असताना आता त्यावर उद्यान/पार्क असे आरक्षण टाकण्यात आले आहे. या शेजारी असलेल्या पार्क क्लबच्या जागेवरही उद्यान/पार्कसह क्लब जिमखाना व मनोरंजन मैदान असे आरक्षण टाकण्यात आले आहे.
दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे आरक्षण नवीन सुधारित विकास आरखडयात बदलण्यात आले आहे. महापौर निवासातील रहिवासी वापराचे आरक्षण काढून सावरकर स्मारकाच्या जागेवर टाकण्यात आले आहे. या स्मारकाच्या मूळ जागेचे आरक्षण हे ऑडिटोरिअम असे होते. ते बदलून रहिवासी वापराचे करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या व्यावसायिक वापरासाठी या स्मारकाच्या इमारतीचा वापर होत असला तरी भविष्यात निवासी इमारत बांधण्याचा मार्ग सुकर केल्याचे उघड होत आहे.
No comments:
Post a Comment