मुंबई, दि. 31:- राज्यातील भिषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडील कर्जाची संपूर्ण माफी करावी आणि राज्यमंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्री एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजभवनात राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात 25 आमदारांचा समावेश होता.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे सरकार दुर्लक्ष करीत असून दुष्काळ दडविण्याच्या सातत्याने प्रयत्न करत आहे. मा.न्यायालयाच्या आदेशानंतर दुष्काळ जाहिर करूनही दिलासादायक निर्णय घेण्यात आलेले नाहीत. मागणीअसताना चारा छावण्याही सुरू होत नाहीत आणि सुरू असलेल्या छावण्यांची बिले दिली जात नाहीत. मागील काळात जाहीर केलेले अनुदान अद्याप मिळालेले नाही. दुष्काळाग्रस्त जनतेप्रति शासनाची सुडबुध्दी स्पष्ट दिसत असून राज्यातील वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, पाण्यासाठी जात असलेले बळी याकडेही यावेळी झालेल्या चर्चेत राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले.
दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी कर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, वीज देयके काम करावीत, आगामी हंगामासाठी मोफत खते, बि-बियाणे उपलब्ध करून द्यावीत. नविन हंगामाकरिता कर्ज उपलब्ध करून द्यावे, पाण्यासाठी बळी गेलेल्यांच्या कुटूंबियांनाही आर्थिक मदत करावी, काद्यांला मिळत असलेला कवडीमोल भाव त्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली परवड पाहता शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल अडीच हजार रूपये अनुदान देणेबाबत सरकारला निर्देश देण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
मंत्रिमंडळातील एकनाथ खडसे यांच्यासारख्या वरिष्ट मंत्र्यांचे राष्ट्रद्रोही दाऊद इब्राहीम याच्यासोबत असलेले तथाकथित संबंध, त्यांनी पदाचा दुरूपयोग करून पुण्याच्या भोसरी भागातील लाटलेली कोट्यावधी रूपयांची जमीन, निकटवर्तीय गजानन पाटील याला 30 कोटींची लाच मागितल्याबद्दल झालेली अटक आणि या सर्व प्रकरणी त्यांचा असलेला संबंध, यामाध्यमातून होत असलेला भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधतानाच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
त्याचप्रमाणे डोंबिवली (ठाणे) येथील केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी दहा लाख रूपये, जखमींना प्रत्येकी दोन लाख रूपये मदत करणेबाबत शासनाला निर्देश द्यावेत. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल अवमानकारक व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या ए.आय.बी. कंपनी आणि संबंधितांविरूध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश शासनाला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. या शिष्टमंडळात आमदार हेमंत टकले, जितेंद्र आव्हाड, मधुसूदन केंद्रे, संदीप बाजोरिया, अनिल भोसले, विद्याताई चव्हाण, प्रकाश गजभिये आदींचा समावेश होता.
No comments:
Post a Comment