मुंबई : पर्सेसीन नेट मच्छीमारांवर ५ फेब्रुवारीपासून शासनाने घातलेली बंदी पैसे देऊन उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी शुक्रवारी एकनाथ खडसे यांच्यावर केला होता. मात्र बंदी उठवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून तांडेल यांनी खोटे आरोप केल्याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा पर्सेसीन मच्छीमारांच्या संघटनेने सोमवारी दिला.
पर्सेसीन नेट मच्छीमारांवरील बंदी उठवण्यासाठी मस्त्यविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी १५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप तांडेल यांनी केला होता. मात्र त्याबाबतचे पुरावे सादर न करता, एसआयटीने पुरावे शोधून काढण्याचे आवाहन केले होते. मात्र बंदी उठवण्यासाठी सर्व बैठका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरू असून तशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केल्याचा खुलासा पर्सेसीने नेट मच्छीमार संघटनेचे उपाध्यक्ष गणेश नाखवा यांनी केला आहे. शिवाय खडसे यांच्या नावाचा प्रसिद्धीसाठी वापर करताना, कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप केल्याप्रकरणी तांडेल यांनी माफी मागितली नाही, तर न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नाखवा यांनी सांगितले.
नाखवा म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून मासेमारी बंद असल्याने पर्सेसीन नेट मच्छीमार कर्जात बुडालेले आहेत. त्यामुळे १५ कोटींचा हफ्ता देणे मच्छीमारांसाठी अशक्य आहे. शिवाय बंदी उठवण्यावरील सर्व चर्चा मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत सुरू आहे. सुरूवातीची पहिली बैठक केवळ खडसे यांच्यासोबत झाली होती. मात्र त्यानंतर खडसे यांच्यासोबत त्यांच्या बंगल्यावर एकही बैठक झालेली नाही.
पर्सेसिन व पारंपारिक मच्छिमारांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दामोदर तांडेल करत असल्याचा आरोप नाखवा यांनी केला. मात्र तांडेल सारखे नेते राजकारणापायी मच्छीमारांमध्ये वाद घडवत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. तरी बंदीची अधिसूचना जारी झाल्यावर येलो गेट पोलीस ठाणे, कुलाबा पोलीस ठाणे आणि बंदर निरिक्षकांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment