मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासमोरील भविष्यातील आव्हाने स्वीकारताना एसटीत परिवर्तन घडविण्यासाठी महामंडळातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कृतीशील गतिमानता दाखविण्याची गरज आहे. या कृतीशील गतिमानतेने एसटी महामंडळाच्या पुढील वाटचालीकडे मार्गक्रमण करुया, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केले.
मुंबई सेंट्रल येथील एस.टी. महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय परिसरात श्री. रावते यांच्या उपस्थितीत ‘एस.टी.चा 68 वा वर्धापन दिन, वाढीव उत्पन्न दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास एस.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, वाहतूक महाव्यवस्थापक वि. व. रत्नापारखी, मुख्य लेखाधिकारी एकनाथ मोरे, भांडार महाव्यवस्थापक रा. रा. पाटील, यंत्र अभियांत्रिकी महाव्यवस्थापक व. बा. गायधनी, महाव्यवस्थापक सुर्यकांत अंबाडेकर, एस.टी. महामंडळातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटी बसनेच प्रवास करावा यासाठी संपूर्ण राज्यभर अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगून एस.टी. बसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंड आकारण्यात येतो. परंतु काही ठिकाणी असे प्रकार वारंवार घडतात. अशा वेळी विना तिकीट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास त्या प्रवाशाला शेवटच्या स्थानकापर्यंत बसमध्येच थांबवून ठेवण्याची कल्पना राबविण्याचा महामंडळाचा विचार सुरु असल्याचेही श्री. रावते यांनी सांगितले.
एसटी महामंडळाला आज 68 वर्ष पूर्ण झाले आहे. या 68व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत 100 वर्षानंतरही येणाऱ्या पिढीला एस.टी. महामंडळाची बस ही ‘आपली बस’ असा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा गरज आहे. या 68व्या वर्धापन दिन वाढीव उत्पन्न दिन म्हणून साजरा करत असताना बस चालक, वाहकांनी प्रोत्साहित करण्यासाठी वाढीव उत्पन्नावरील प्रत्येकी 10 टक्के रक्कम दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एसटी महामंडळात जवळजवळ 38 वर्षांपासून अविरतपणे काम करणाऱ्या राज्यभरातील 68 सेवा ज्येष्ठ कामगारांचा या वर्धापन दिनी सत्कार करण्यात आला असून मुंबई सेंट्रल या मध्यवर्ती आगारातील 12 कामगारांचा 5 हजार रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन श्री. रावते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात श्रीमती स्नेहलता राजाध्यक्ष,दिलीप सुर्वे, श्रीमती अक्षदा दरेकर, एल. व्ही. नार्वेकर, आर. ए. पावटे, सुरेश भुजबळ, शशिकांत भोसले, सीताराम परब, दिलीप विघ्ने, श्रीमती रेखा नारकर, अशोक शिंदे आणि दिलीप लाड या सत्कारमुर्तींचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना राज्यभरातील 68सत्कारमुर्तींनी एसटी महामंडळातील आपल्या चांगल्या अनुभवांचे लेखन करुन त्याचे ग्रंथ तयार करावेत. त्यामुळे येणाऱ्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल, असेही श्री. रावते यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment