राज्यातील 86 कर्मशाळांमधील 1046 कर्मचाऱ्यांना लाभ
मुंबई - 14 June 2016
स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित अपंगांच्या विशेष शाळेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच अपंगांच्या 86 कर्मशाळा व संलग्न वसतिगृहामधील पूर्णवेळ कार्यरत 1046 कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच या निर्णयाचा लाभ 1990 पासून सेवा निवृत्त झालेल्या 206 कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.
विविध संस्थांमार्फत अपंगांसाठी चालविण्यात येणाऱ्या राज्यातील विशेष शाळांना 31 मार्च 1981 पासून सेवानिवृत्ती योजना लागू करण्यात आली होती. परंतु, या कर्मशाळांना 100 टक्के वेतन योजना लागू नसल्याने त्यांना या निर्णयाचा उपयोग होत नव्हता. दरम्यान 10 ऑगस्ट 1990 च्या शासन निर्णयाद्वारे कर्मशाळेतील या कर्मचाऱ्यांना 100 टक्के वेतन योजना लागू करण्यात आली होती. मात्र, हे कर्मचारी सेवानिवृत्ती वेतन योजनेपासून वंचित होते. या निर्णयाने या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
या निर्णयामुळे सेवानिवृत्ती योजनेसाठी लागणाऱ्या 7,95,95,478 व उपादानासाठी लागणाऱ्या 2,57,73,702 अशा एकूण 10 कोटी 53 लाख 69 हजार 180 एवढ्या अनावर्ती खर्चास मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे यापुढील सेवानिवृत्ती वेतनासाठी 4,19,40,300 एवढ्या आवर्ती खर्चासही मान्यता देण्यात आली. तसेच 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना नवीन अंशदान सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येईल.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق