मुंबई, दि.१४ : राज्यातील कायम विनाअनुदानित पात्र घोषित शाळांना २० टक्के अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ राज्यातील १६२८ पात्र शाळांमधील १९,२४७ शिक्षकांना होणार आहे. त्यामध्ये २,४५२ तुकड्यांचा समावेश आहे. या अनुदानामुळे १६३.२१ कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाच्या विषयावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर ज्या शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत, अशा शाळांना २० टक्के अनुदान देण्यात येणार असून हे अनुदान यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
हा प्रश्न विधीमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर आगामी शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी अनुदानाचा प्रश्न नक्कीच मार्गी लावू असे आश्वासन तावडे यांनी दिले होते. यंदाच्या शैक्षणिक वर्षाला उद्या १५ जून पासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी आज मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या सकारात्मक निर्णयामुळे खऱ्या अर्थाने शिक्षकाचे हित जपले जाईल असा विश्वास श्री.तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
No comments:
Post a Comment