मुंबई, दि. 10 : लोकशाहीमध्ये माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माध्यमे नसती तर लोकशाही निरंकुश झाली असती. मात्र, अलीकडील सोशल मीडियावर कोणतेही अंकुश नाही. त्यामुळे मनाला येईल ती माहिती प्रसारित केली जात असून सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. त्यामुळे त्यावरही नैतिकतेचे अंकुश लावण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने परिषदेचे संस्थापक यशवंत पाध्ये यांच्या स्मरणार्थ आदर्श पत्रकारिता साहित्य सन्मान 2016 च्या पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक होते. यावेळी आमदार सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेचे अध्यक्ष कृष्णा शेवडीकर,कार्याध्यक्ष रमेश खोत, उपाध्यक्ष प्रकाश कुलथे, गजानन चव्हाण, सचिव एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष राजू पाध्ये,सदस्य संजय मलमे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी झी चोवीस तास वाहिनीचे मुख्य संपादक उदय निरगुडकर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार, टाईम्स ऑफ इंडियाचे राजकीय संपादक प्रफुल्ल मारपकवार यांना लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांना गो.ग. आगरकर स्मृती पुरस्कार, दै. केसरीचे संपादक सुकृत खांडेकर यांना शि. म. परांजपे स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांना विष्णूशास्त्री चिपळूणकर स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार,महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार राजेश चुरी यांना प्रबोधनकार ठाकरे स्मृती साहित्य पुरस्कार आणि पत्रकार स्वाती लोखंडे यांना भुरीबाई केसरीमलजी जैन पुरस्काराने गौरविण्यात आले. अकरा हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,पत्रकारितेमध्ये वेगळा ठसा उमटविलेल्या आणि ज्यांच्याकडे पाहून पत्रकारितेवरचा विश्वास मजबूत होतो अशा व्यक्तींना पुरस्कार देणे ही गौरवाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात पत्रकारितेची परंपरा मोठी आहे. माध्यमांनी लोकशाहीवर अंकुश ठेवणे आवश्यक असून निरंकुश लोकशाहीमध्ये मूठभर लोकांचीच प्रगती होते. सध्या सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. सोशल मीडियामध्ये प्रगल्भता आणण्याची आवश्यकता आहे. माहिती व ज्ञान यातील फरक सोशल मीडियातील लोकांना जाणवणे गरजेचे आहे. व्हॉटस्अॅप सारख्या माध्यमातून केवळ माहितीवर आधारित बातम्या प्रसारित केल्यामुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडू शकते. चांगल्या कामासाठी, लोकशाहीवर अंकुश ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होणे गरजेचे आहे.
निःपक्षपाती पत्रकारितेसाठी पत्रकारांना सामाजिक सुरक्षा देणे आवश्यक असून त्यासाठी राज्य शासन आवश्यकता ते पावले उचलत आहे. राज्य शासनाने नव्याने घोषित केलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पत्रकार व त्यांच्या परिवारास विशेष सुविधा देण्यात येणार आहे. या योजनेतून राज्यातील सातशे ते साडेसातशे रुग्णालयांमध्ये त्यांना कॅशलेस पद्धतीने आरोग्य सेवा मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र संपादक परिषदेने दिलेल्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही राज्य शासन करेल. त्यासाठी माध्यमांनी राज्य शासनाला सकारात्मक सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कर्णिक म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिग्गज पत्रकारांनी महाराष्ट्र घडविण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. ज्येष्ठ पत्रकारांनी घडविलेला महाराष्ट्र आता तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती दिला आहे. राज्यकर्त्यांना पत्रकारांची भिती वाटत असल्याचे सांगितले जाते. त्यांना पत्रकारांची भिती नाही तर धाक वाटायला हवा. राज्याचे भले करण्याचे काम पत्रकारांनी करावे.
यावेळी निरगुडकर, मारपकवार यांनी मनोगत व्यक्त केले. मारपकरवार यांनी पुरस्काराची रक्कम जलयुक्त शिवार योजनेसाठी दिली. यावेळी राज्य अधीस्विकृती परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार यदू जोशी यांचा तसेच महाराष्ट्र कामगार संघटनेचे चिटणीस शंकरराव मोरे, अधीस्विकृती समितीच्या सदस्य शारदादेवी चव्हाण, नगरसेवक सुधीर जाधव, गजानन चव्हाण, राजेंद्र मोहिते आदींचाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मलमे यांनी प्रास्ताविक केले तर खोत यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला खाडिलकर यांनी केले.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق