मुंबई : गर्दीच्या वेळेत लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेने तीन एक्स्प्रेसमधून लोकलच्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा तीन महिन्यांपूर्वी दिली होती. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ही सेवा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहताच बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आणि ही सेवा अखेर बंद करण्यात आली.
२६ जानेवारी २0१६ पासून महालक्ष्मी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस आणि लातूर एक्स्प्रेसमधून प्रवासाची मुभा देत, या सेवेला सुरुवात करण्यात आली. ठाणे आणि कल्याण स्थानकातून प्रवासाची मुभा देतानाच सेकंड क्लासच्या पासधारकांसाठी कल्याणमधून ३0 तर ठाण्यातून २0 रुपये आकारणी, तर फर्स्ट क्लास पासधारकांना कल्याणमधून २0 तर ठाण्यातून दहा रुपये मोजावे लागत होते. १0 आणि २५ च्या कुपन्सची पुस्तिका देताना प्रथम महिला प्रवाशांना प्राधान्य होते. महिलांकडून प्रतिसाद न मिळाल्यास, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, तर सर्व प्रवाशांसाठी ते कुपन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, ही सेवा सुरू झाल्यानंतर त्याला अपेक्षेपेक्षा प्रतिसाद मिळाला नाही. फेब्रुवारी महिन्यापर्यंत तर एकूण ९00 पुस्तिकांपैकी अवघ्या आठ पुस्तिकांची विक्री झाली होती. मार्च आणि एप्रिल महिन्यातही तीच परिस्थिती होती. सुरुवातीच्या दोन महिन्यांत रेल्वेची फक्त १,६00 रुपये कमाई झाली. एकूणच होणारा खर्च आणि मिळत नसलेला प्रतिसाद पाहता, मध्य रेल्वेने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ही सुविधा तीन महिन्यांसाठीच होती.
No comments:
Post a Comment