मुंबई, दि. २९ : शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण केंद्राची जागा विकसित करुन तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र तसेच वसतिगृह, कर्मचारी निवासस्थाने बांधण्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिले.
उल्हासनगर येथे नव्याने प्रशिक्षण संस्था बांधण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बडोले बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्र बागडे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, ठाण्याचे सहायक आयुक्त उज्वला सपकाळे, ठाणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी रविकिरण पाटील, शासकीय प्रौढ प्रशिक्षण केंद्राचे प्रतिनिधी एम. डी. जामुनकर, बार्टीचे संचालक हंबीरराव कांबळे आदी उपस्थित होते.
उल्हासनगर येथील शासकीय प्रौढ मूकबधीर प्रशिक्षण केंद्राची इमारत मोडकळीस आली असून, या जागेची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था, पुणे यांनी केली होती. या जागेवर नवीन प्रस्तावानुसार प्रशिक्षण कार्यालय, वसतिगृह, कर्मचारी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. यासंदर्भातील कार्यवाही त्वरित करण्यात यावी, असे निर्देश श्री. बडोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
No comments:
Post a Comment