वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना घरपोच नोटीसा - परिवहनमंत्री दिवाकर रावते - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2016

वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना घरपोच नोटीसा - परिवहनमंत्री दिवाकर रावते

• परिवहन विभागाच्या वायुवेग पथक वाहनांवर व्हिडीओ कॅमेरे
• 750 वाहन मालकांना दिल्या घरपोच नोटीसा
• वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 44 हजार 817 वाहनांवर दंडात्मक कारवाई
• 39 लाख 54 हजार 820 रुपये दंड वसुल
• 1533 वाहनचालकांचे वाहन लायसन्स (अनुज्ञप्ती) 3 महिन्यांसाठी निलंबित
• 1055 वाहनचालकांचे समुपदेशन
• राज्यातील प्रमुख शहरे व महामार्गांवर प्रायोगिक तत्वावर राबविणार मोहिम
मुंबई दिनांक 22- राज्यातील अपघात रोखण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. वाहनचालकांना शिस्त लागावी तसेच वाहनांची वेग मर्यादा टिपण्यासाठी आता परिवहन विभागाच्या वायुवेग पथकातील वाहनांवर लावण्यात आलेल्या व्हिडीओ कॅमेऱ्यांची नजर राहणार असून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनचालकांना घरपोच नोटीसा बजावण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

येथील सह्याद्री अतिथीगृहात परिवहनमंत्री रावते यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, परिवहन आयुक्त शाम वर्धने, मुंबई वाहतुक विभागाचे सह पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना रावते म्हणाले की, द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, वाहन चालकांमध्ये शिस्त लागावी म्हणून या मार्गावर वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश तपासणी पथकाला दिले होते. त्यानुसार  9 जून ते 17 जून 2016 या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह मुंबई व पुणे शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल तसेच महामार्ग पोलीस, पुणे व ठाणे यांनी धडक वाहन तपासणी मोहिम राबविली.

या मोहिमेत महामार्ग पोलीस, ठाणे व पुणे यांनी केलेल्या वाहन तपासणीत 2168 वाहने दोषी आढळली असून त्यांचेकडून 3 लाख 78 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे, पिंपरी चिंचवड व पनवेल यांच्यामार्फत करण्यात आलेल्या तपासणीत लेन कटींग करणे, अतिवेगाने व बेदरकारपणे वाहन चालविणे, सीट बेल्ट न लावणे, ओव्हर डायमेन्शन व ओव्हरलोड वाहतुक करणे अशी एकूण 2764 वाहने दोषी आढळली असून त्यांचेकडून 30 लाख 36 हजार 820 रुपये इतका दंड वसुल करण्यात आला आहे. तर 34 वाहने जप्त करण्यात आल्याची माहितीही रावते यांनी यावेळी दिली.

वाहन तपासणी मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी वायुवेग पथकाच्या वाहनांवर व्हीडीओ कॅमेरे लावण्याच्या सुचना परिवहन विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी 16 ते 21 जून 2016 या कालावधीत वायुवेग पथकाच्या वाहनांवर व्हीडीओ कॅमेरे लावून वाहनांची तपासणी केली. वाहन तपासणी मोहिमेसाठी हा प्रयोग राज्यात प्रथमच करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड आणि पनवेल परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाच्या वाहनांवरील व्हीडीओ कॅमेऱ्यांच्यामार्फत लेन कटींग / विहित वेगमर्यादेचे उल्लघंन केलेल्या एकूण 1165 वाहनांवर  कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 750 वाहनमालकांना घरपोच नोटीसा देण्यात आल्या आहेत. तर उर्वरितांना नोटीसा पाठविण्याची कार्यवाही सुरु आहे. ज्या ठिकाणी वाहनमालक घरी उपलब्ध नसेल अशावेळी त्यांचे घरावर नोटीस दर्शनी भागात लावण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले.

मुंबई, पुणे शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनचालकांवर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने दिंनाक 1 जानेवारी ते 21 जून 2016 या कालावधीत 39 हजार 885 दोषी वाहन चालकांवर कारवाई केली असून त्यांचेकडून 5 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबई शहरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1533 वाहनचालकांचे वाहन लायसन्स (अनुज्ञप्ती) निलंबित करण्यात आले असून 1055 वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात आल्याची माहितीही रावते यांनी दिली. पावसाळयाच्या कालावधीत वाहनांचे अपघात वाढतात ही बाब लक्षात घेऊन सर्व वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही रावते यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad