मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिका हद्दीत मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे सुरु असून ‘एन’ विभाग आणि ‘एम/पूर्व’ विभागातील नालेसफाई कामांची स्थापत्य समिती (उपनगर) चे अध्यक्ष अनंत नर यांनी आज (दिनांक ०२ जून, २०१६) पाहणी केली. यावेळी नगरसेवक दीपक हांडे, शांताराम पाटील, नगरसेविका रेश्मा नेवरेकर उपस्थित होते.
घाटकोपर येथील मोहन नगर नाल्यापासून या पाहणी दौऱयाचा प्रारंभ झाला. कुर्ला टर्मिनस रस्त्यावर सोमय्या नाल्यावर नीळकंठ इमारत आणि आशुतोष इमारत यांना जोडणाऱया सिमेंट काँक्रीट स्लॅब व लोखंडी जाळीला आधार म्हणून नाल्याच्या मधोमध लावण्यात आलेली उभी लोखंडी जाळी तात्काळ काढून टाकावी. जेणेकरुन, या जाळीमध्ये कचरा अडकून पाणी तुंबणार नाही, असे निर्देश नर यांनी दिले. विद्याभवन शाळेजवळ देखील सोमय्या नाला प्रणालीची पाहणी करण्यात आली.
पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पंतनगर बेस्ट आगाराजवळ लक्ष्मीबाग नाला प्रणाली कामांची पाहणी करताना नर म्हणाले की, नाल्याकाठी असलेला गाळ व इतर कचरा नाल्याच्या मुखावरुन लवकरात लवकर उचलून न्यावा. कामराज नगर येथे रायझिंग सिटीमागील पी. डब्ल्यू. डी. नाल्याकाठी असलेल्या अतिक्रमित बांधकामांची यादी तयार करण्याचे निर्देश देतानाच या नाल्यात साचत असलेल्या तरंगत्या वस्तू तात्काळ काढण्याचे निर्देश नर यांनी दिले.
‘एम/पूर्व’ विभागात शिवाजीनगर, गोवंडी येथील रफीक नगर खोलवर संयंत्रे व मनुष्यबळ नेऊन नाल्यात गाळ आणि इतर कचरा काढण्याच्या सूचना नर यांनी संबंधित अधिकाऱयांना दिल्या. मानखुर्द येथे साठे नगर, चिल्ड्रन एड सोसायटी नाल्यामध्ये देखील जे. सी. बी. व तत्सम संयंत्रे खोलवर उतरवून स्वच्छता करुन घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. मानखुर्द येथील मोहिते-पाटील नगर नाल्याची देखील पदाधिकाऱयांनी पाहणी केली.
No comments:
Post a Comment